मिरज : मिरजेतील मीरासाहेब दर्गा उरूसानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेत शास्त्रीय गायन, तसेच सनई, सारंगी, सतार व तबलावादनास श्रोत्यांची दाद मिळाली. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या मैफलीस मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.पंडित शैलेश भागवत यांच्या सनईवादनाने दुसऱ्या दिवशीच्या संगीत सभेचा प्रारंभ झाला. भागवत यांनी राग बसंत आळविला. त्यांना पंडित माधव मोडक यांनी तबलासाथ, विठ्ठल केंगार यांनी सनईसाथ व संदीप तावरे यांनी संवादिनीसाथ केली. श्रीमती देवकी पंडित यांनी राग मधुकंस आळविला. विलंबित एकताल व द्रुत त्रितालात त्यांनी चीजा सादर केल्या. त्यांना कृष्णा मुखेडकर यांनी हार्मोनियमसाथ व रोहित मुजुमदार यांनी तबलासाथ केली.उस्ताद फारूख लतीफ खान यांनी सारंगीवादन केले. त्यांनी सारंगीवर राग मालकंस आळविला. त्यांना मकरंद तुळाणकर यांनी तबलासाथ केली. पंडित नयनघोष व इशानघोष यांनी सोलो तबलावादन केले. त्यांनी त्रिताल, कायदा, तुकडा, रेला या तबल्याच्या विविध स्वरछटा सादर केल्या. त्यांना उस्ताद फारूख लतीफ खान यांनी लेहरासाथ केली. पंडित उपेंद्र भट यांनी राग दरबारी गायिला. तीनताल मध्यलयीत त्यांनी बंदिश सादर केली. त्यांना पंडित माधव मोडक यांनी तबलासाथ व पंडित अनंत केमकर यांनी हार्मोनियमसाथ केली.उस्ताद रफत खान यांनी सतारवादन केले. त्यांनी सतारीवर राग बागेश्री सादर केला. त्यांना मकरंद तुळाणकर यांनी तबलासाथ केली. उस्ताद फैयाज खान यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी राग नायकी कानडा आळविला. त्यांना संदीप तावरे यांनी हार्मोनियमसाथ व अंगद देसाई यांनी तबलासाथ केली.श्रीमती अनघा हिंडलेकर यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी राग गुजरी तोडी सादर केला. त्यांना संदीप तावरे यांनी हार्मोनियमसाथ व प्रदीप कुलकर्णी यांनी तबलासाथ केली.दर्गा सरपंच अब्दुल अजिज मुतवल्ली, बाळासाहेब मिरजकर, मोहसीन मिरजकर, मजीद सतारमेकर यांनी संयोजन केले. किराना घराण्यातील गायक, वादकांना श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
सतार, सारंगीवादनाने मैफलीत रंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 11:36 PM