Chandrahar Patil ( Marathi News ) : महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगली लोकसभा मतदारसंघावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण जागावाटप निश्चित होण्याआधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या जागेवरून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली. सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी नुकतीच पक्षश्रेष्ठींची भेट घेत कोणत्याही परिस्थितीत या जागेवरील दावा सोडू नये, अशी मागणी केली. त्यामुळे सांगलीच्या जागेवर महाविकास आघाडीतून नक्की कोण लढणार, याबाबतचा सस्पेन्स निर्माण झाला आहे. अशातच चंद्रहार पाटील यांनी आपल्याला काल उद्धव ठाकरे यांचा फोन आला असल्याचं सांगत त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली आहे.
चंद्रहार पाटील म्हणाले की, "सांगली लोकसभेबाबत वरिष्ठ पातळीवर काय चर्चा सुरू आहे, याची मला कल्पना नाही. मात्र काल मला उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता आणि यावेळी आमची २१ तारखेला सांगलीत होणाऱ्या सभेबाबत चर्चा झाली आहे. आम्ही या सभेच्या तयारीला लागलो आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण एकत्र काम करणार आहोत," असं म्हणत पाटील यांनी आपली उमेदवारी निश्चित असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, काँग्रेसने या जागेवरील दावा सोडलेला नसताना चंद्रहार पाटील यांनीही आपली उमेदवारी निश्चित असल्याचं सांगितल्याने सांगलीवरून महाविकास आघाडीत धुसफूस आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेनं या जागेसाठी हट्ट करू नये; काँग्रेसची आक्रमक भूमिका
सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम यांनी ही जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. "सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यासाठी ठाकरेंनी हट्ट करू नये. सांगलीत आज ६०० गावे आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वानं सांगावे, यातील १० टक्के ग्रामपंचायती तरी त्यांच्याकडे आहेत का? कुठल्याही परिस्थितीत आम्ही सांगली मतदारसंघ सोडणार नाही. टोकाची भूमिका घ्यायला लागली तरी घेऊ, परंतु ही जागा काँग्रेसकडे राहिली पाहिजे हे आमचे ठाम मत आहेत," असं कदम यांनी म्हटलं आहे.
विश्वजित कदम यांच्यासह सांगलीच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही नुकतीच बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या भेटीनंतर विश्वजित कदम म्हणाले होते की, "कुठल्या जागेबदली कोणती जागा द्यावी हा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रश्न आहे. परंतु सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही. चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी, पैलवान म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु राजकारण, समाजकारण करताना विचारधारेचे पाठबळ लागते आणि सातत्याने लोकांमध्ये जनसंपर्क ठेवून लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात. सांगली जिल्ह्यातील अनेक प्रश्न आहेत. चंद्रहार पाटील यांनी ६-७ दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाची मागणी चुकीची आहे," असं विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे.