सांगली - गेल्या तेरा दिवसापासून बेपत्ता असलेल्या सांगलीवाडीतील सुरेश संगाप्पा सुतार (वय ४८) यांचा कर्नाटकातील विजापूर येथे खून झाल्याचे रविवारी सकाळी निष्पन्न झाले. पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवून अंधश्रद्धेतून त्यांचा खून झाल्याचा संशय आहे. सांगली शहर पोलिसांचे पथक तातडीने विजापूरला रवाना झाले आहे.
सुरेश सुतार हे सुतार काम करीत होते. १३ मार्चला दुपारी तीन वाजता त्यांना मोबाईलवर एक कॉल आला. त्या व्यक्तीशी सुतार काही वेळ बोलले. ‘काम होत असेल तर मी लगेच येतो’, असे त्यास म्हणाले. त्यानंतर घरात कोणाला काही न सांगता साडेतीन वाजता निघून गेले. पण ते परत आले नाहीत. नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. मात्र मोबाईल बंद होता. त्यांचा सर्वत्र शोधही घेतला. परंतु कुठेच सुगावा लागला नाही. त्यामुळे ते बेपत्ता असल्याची फिर्याद १५ मार्चला शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिस तपास संथगतीने सुरु राहिल्याने नातेवाईकांनी अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांची भेट घेवून तक्रार दाखल केली. बोराटे यांनी शहर पोलिसांकडून तपासाचा आढावा घेवून तातडीने याचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. नातेवाईकांनी चाँद नामक व्यक्तीवर संशय घेतला. पोलिसांनी चाँदला ताब्यात घेऊन चौकशी केली. पण काहीच धागेदोरे न मिळाल्याने त्याला सोडून दिले होते. सुतार यांचा विजापुरात खून झाल्याची मािहती रविवारी सकाळी शहर पोलिसांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक रोहित चौधरी यांचे पथक तातडीने विजापूरला रवाना झाले आहे. संशयित चाँद खुनाचा सुत्रधार असण्याची शक्यता आहे. त्याने सुतार यांना पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखविले. या बदल्यात त्याने सुतार यांच्याकडून काही रक्कम घेतली होती. मात्र चाँदने पैशाचा पाऊस पाडलाच नाही. तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. सुतार यांनी पैशाची मागणी केली. यातून त्यांच्यात वादही झाले होते. खुनामागे हे कारण पुढे येण्याची शक्यता आहे. दुस-या दिवशीच खूनसुतार १३ मार्चला बेपत्ता झाल्यानंतर १४ मार्चला विजापूर रस्त्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाची ओळख पटली नसल्याचे विजापूर पोलिसांनी पंचनामा व विच्छेदन तपासणी करुन हा मृतदेह शवागृहात ठेवला आहे. १३ मार्चलाच सुतार यांचा खून झाल्याची शक्यता आहे. त्यांचे डोके दगडाने ठेचले आहे.