सांगली : येथील कृष्णा नदीत शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पोहणाऱ्यांच्या घोळक्यात अचानक दहा ते बारा फुटी मगर घुसल्यामुळे लहान बालकांसह नागरिकांचा थरकाप उडाला. ‘मगर आली...पळा...पळा...’ असे म्हणत प्रत्येकाने आरडाओरड आणि धावाधाव सुरू केली. मगरीच्या दर्शनानंतर अनेकांनी न पोहताच घरचा रस्ता धरला.
कृष्णा नदी काठावर दररोज मगरीचे दर्शन होते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने दररोज पोहायला येणाºयांची संख्या कमी न होता ती वाढतच आहे. विशेषत: शाळकरी मुले पोहायला शिकायला येत असल्याने गर्दी वाढली आहे. शनिवारी सकाळी साडेसात वाजता वसंतदादा समाधीस्थळ ते सांगलीवाडी या मार्गावरील नदीकाठी दुतर्फा पोहणाºयांची गर्दी होती. आयर्विन पुलाकडून दहा ते बारा फुटी मगरीने अचानक पाण्यात प्रवेश केला. पाण्याखालून ती पोहणाºया लहान-मोठ्यांच्या घोळक्यात घुसली. घोळक्यात मगर घुसल्याचे समजताच सगळ्यांचाच थरकाप उडाला. ‘अरे पळा पळा... मगर आली...’ असे काहीजण म्हणताच अनेकांची घाबरगुंडी उडाली. प्रत्येकजण पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धावाधाव करू लागला. विशेषत: शाळकरी मुले गोंधळून गेली. पाण्यातून बाहेर पडताना अनेकजण पायºयांवर पाय घसरून पडले.
कृष्णा नदीत दररोज पोहायला येणाºया नागरिकांनी सर्वांना घाबरू नका, शांत बसा, मगर काहीही करत नाही, पाण्यात आता कुणीही उतरू नका, असा आपुलकीचा सल्ला दिला. कारण, आयर्विन पुलाकडून बायपासच्या पुलाकडे मगर जात होती. पण, सांगलीवाडी नदीकाठावरील नागरिकांनी दंगा केल्यामुळे ती पाण्यातच बुडून राहिली. पुढे कुठे निघाली हे लवकर कळाले नसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अनेकजणांना पोहण्यासाठी पाण्यात उतरण्यापूर्वीच मगरीचे दर्शन झाल्यामुळे ते न पोहताच घरी परतले. आयर्विन पुलाच्या जवळपास दहा ते बारा फुटांवर मगर नदीपात्रात संचार करताना काहींनी तिचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले.मगर पकडून चांदोली धरणात सोडा : संजय चव्हाणसांगलीच्या कृष्णा नदीत दीडशे ते दोनशे नागरिक व लहान मुले पोहण्यासाठी रोज येत आहेत. मगरीचे दर्शन वारंवार होत असल्यामुळे तिला पकडून चांदोली धरणात सोडून देण्याची मागणी होत आहे. पण वनविभागाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांनी केली.