लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : आईला आदरांजली व समाजाचे ऋण मृत्योत्तर फेडावेत, या भावनेतून सांगलीतील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अॅड. चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबातील सात सदस्यांनी देहदानाचा संकल्प केला. देहदानाची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करुन सर्व अर्ज मिरज शासकीय महाविद्यालयात दिले आहेत.
मृत्यूनंतरच्या सर्व कर्मकांडास फाटा देऊन नवा पायंडा पाडण्याची किमया अॅड. शिंदे व त्यांच्या कुटुंबाने केली आहे. गेल्या आठवड्यात शिंदे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई शिंदे यांचे निधन झाले. पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन आईच्या मृतदेहाचे कोणत्याही विधिविना मिरजेतील डिझेल दाहिनीत दहन केले. तसेच अस्थींचे नदीत विसर्जन न करता घरच्या बागेतील आम्रवृक्षाच्या मुळाशी त्या समर्पित केल्या. तेरावा घालण्याचे टाळून स्मरण दिन आयोजित करुन, आईच्या लहानपणापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून तिच्या आठवणींना उजाळा दिला.शंभर जणांना भोजनलक्ष्मीबाई शिंदे यांच्या स्मरणदिनी शंभर निराश्रीतांना भोजन दिले. समाजाचे ऋण फेडावेत, या भावनेतून शिंदे यांचे वडील शामराव, बंधू किशोर, पत्नी शोभा, मुली निशीगंधा, दिशा, पुतण्या वैभव यांनी देहदानाचा संकल्प करून आदरांजली वाहिली.