मिरज : नवी दिल्ली येथील संगीत नाटक अकादमीतर्फे संगीत क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार मिरजेतील ज्येष्ठ तंतुवाद्य निर्माते, मजीद गुलाबसाहेब सतारमेकर यांना जाहीर झाला. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते एक लाख रुपये व ताम्रपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. या पुरस्कारामुळे मिरजेच्या तंतुवाद्यनिर्मिती क्षेत्राला बहुमान मिळाला आहे.मिरज शहराला सुमारे दीडशे वर्षाची तंतुवाद्यनिर्मितीची परंपरा आहे. शहराची जगात ख्याती आहे. गेली ४५ वर्षे तंतुवाद्यनिर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेल्या मजीद सतारमेकर यांनी देश-विदेशातील नामांकित गायक-वादकांना दर्जेदार तंतुवाद्ये पुरविली आहेत. तंतुवाद्यनिर्मितीतील कौशल्यामुळे त्यांना जपान व फ्रान्समध्ये कार्यशाळेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. मजीद सतारमेकर व त्यांचे पुत्र अतिक सतारमेकर जपान येथील कार्यशाळेतही सहभागी झाले होते.सतारमेकर देशातील अनेक मोठ्या संगीत महोत्सवांमध्ये तंतुवाद्यांचा पुरवठा करतात. मिरजेतील संगीतरत्न अब्दूलकरीम खाँ संगीत महोत्सव, श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव, आबासाहेब सतारमेकर स्मृती संगीत महोत्सव यासह अन्य महोत्सवांच्या संयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल नवी दिल्लीतील संगीत नाटक अकादमी या देशातील संगीत, नृत्य व नाटक क्षेत्रातील सर्वोच्च शासकीय संस्थेने त्यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड केली आहे. या संस्थेतर्फे संगीत, नाटक व नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या देशातील कलाकाराला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सतारमेकर यांना राष्ट्रपतींच्या हस्ते एक लाख रुपये व ताम्रपत्र असा पुरस्कार लवकरच प्रदान करण्यात येणार आहे. मिरजेतील तंतुवाद्यनिर्मिती क्षेत्रातील सर्वच कलाकारांच्या सहकार्यामुळे हा सन्मान मिळाल्याची प्रतिक्रिया सतारमेकर यांनी व्यक्त केली.
तंतुवाद्य निर्माते मजीद सतारमेकरांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 1:50 PM