सांगली : येथील एका नगरसेविकेला मोबाईलवर संदेश (एसएमएस) पाठवून तिचा विनयभंग केल्याची घटना आज, शनिवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रामचंद्र निवृत्ती कोळेकर (वय २८, रा. विद्यानगर, वारणाली गल्ली, क्रमांक चार, विश्रामबाग) व आशिष प्रमोद पाटील (२३, विद्यानगर गल्ली, क्रमांक पाच, वारणाली, विश्रामबाग) या दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. नगरसेविकेला त्यांच्या मोबाईलवर काल, शुक्रवारी रात्री ‘पंख नाही मला, उडण्याची स्वप्ने जरूर पाहतो. आयुष्य कमी आहे, तरी मरमरून जगतो. आपल्या माणसावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतो’, असा संदेश आला होता. संदेश पाठविणारी व्यक्ती अनोळखी होती. यामुळे नगरसेविकेने संदेशवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी संशयितांनी ‘वहिनी, तुम्ही मला ओळखले नाही का?’, असे विचारून त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे भाष्य केले. या प्रकारानंतर नगरसेविकेने विश्रामबाग पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोबाईल क्रमांकावरून संशयितांचा शोध घेतला. त्यांना सकाळी अटक करून कसून चौकशी केली. नगरसेविका त्यांना ओळखतही नाहीत. त्यांना दुपारी न्यायालयात उभे केले असता जामिनावर मुक्तता करण्यात आली. (प्रतिनिधी)
सांगलीत नगरसेविकेचा विनयभंग; दोघांना अटक
By admin | Published: May 18, 2014 12:11 AM