सांगली : येथील जुनी धामणी रस्त्यावरील अमृता श्रीकांत रहाटे (वय ३०) या तरुणीवर ‘माथेफिरू’ तरुणाने अंगावर राख टाकून टोकदार शस्त्राने खुनीहल्ला केला. चांदणी चौकाजवळील ‘संजीन’ हॉस्पिटजवळ शुक्रवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली. गेल्या पंधरा दिवसांत दोन तरुणींसह चौघींवर या माथेफिरुने हल्ला केला आहे. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमृता रहाटे या एचडीएफसी बँकेच्या कर्मवीर चौक शाखेत सहायक व्यवस्थापक या पदावर नोकरी करतात. शुक्रवारी रात्री त्या बँकेतील काम आटोपून चांदणी चौकमार्गे चालत घरी निघाल्या होत्या. संजीन हॉस्पिटलजवळ गेल्यानंतर पाठीमागून हा माथेफिरू तरुण दुचाकीवरून आला. तो अमृता यांच्यापुढे भरधाव वेगाने गेला. त्यानंतर लगेच पुन्हा परत फिरला. त्याने अमृता यांच्या अंगावर राख फेकली व खिशातील टोकदार शस्त्र काढून हल्ला केला. अमृता यांनी हल्ला चुकविण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्या उजव्या हाताच्या दंडावर घाव बसला. या घटनेमुळे त्या घाबरल्या. त्यांनी आरडाओरड केली. परिसरातील लोक जमा झाले. तेवढ्यात माथेफिरू तरुण पळून गेला.
अमृता यांनी घरच्यांशी संपर्क साधून याची माहिती दिली. घरातील लोक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरात ‘सीसीटीव्ही’ फुटेज मिळते का, याची पाहणी केली. अमृता यांच्याकडून संशयित माथेफिरूचे वर्णन घेण्यात आले आहे. त्याआधारे त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.शोध घेण्याचे आव्हानपंधरा दिवसांपूर्वी शंभरफुटी रस्त्यावर एकाचवेळी दोन महिला व तरुणीवर या माथेफिरूने हल्ला केला होता. यापैकी तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनास्थळावरील ‘सीसीटीव्ही’ फुटेजची पोलिसांनी तपासणी केली. पण अंधार असल्याने माथेफिरूचा चेहरा स्पष्टपणे दिसून आला नाही. त्यामुळे पोलिसांचा तपासही पुढे सरकला नाही. तोपर्यंत शुक्रवारी आणखी एक घटना घडली. या माथेफिरूचा शोध घेणे आव्हान बनले आहे.