सांगली : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डासांची पैदास वाढणार आहे. मागील पाच वर्षात ३६ गावात डेंग्यू, हिवताप आणि चिकुनगुन्याचे सर्वाधिक रुग्ण आढळल्याने ती गावे संवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले.
डासांची घनता जास्त असलेल्या सात गावांत औषध फवारणीसह अन्य उपाय करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच हिवतापविरोधी मोहिमेत लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत म्हणाले, जून महिन्यात हिवताप जनजागरण मोहीम साजरी करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील हिवताप नियंत्रणात आहे. जिल्ह्यात हिवताप, डेंग्यू आणि चिकुनगुन्या या रोगांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत.
शहरी आणि ग्रामीणमध्ये हिवताप रोगाचे रुग्ण अधिक आढळत आहेत. मागील पाच वर्षात डेंग्यू, हिवताप आणि चिकुनगुन्याचे ३६ गावांत सर्वाधिक रुग्ण आढळले होते, या गावांना संवेदनशील जाहीर करण्यात आले आहे.
यात मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, समडोळी, सांगली सिव्हिल, मिरज महापालिका, ईदगाहनगर (ता. मिरज), जत व आवंढी (ता. जत), गौरगाव, मांजर्डे, मणेराजुरी, तासगाव, येळावी (ता. तासगाव), आष्टा, वाळवा, इस्लामपूर, बोरगाव आणि तुजारपूर (ता. वाळवा), शिराळा व मणदूर (ता. शिराळा), कवठेमहांकाळ, तिसंगी आणि ढालगाव (ता. कवठेमहांकाळ), विटा आणि खानापूर (ता. खानापूर), कडेगाव व नेवरी (ता. कडेगाव), आंधळी व पलूस (ता. पलूस) व खरसुंडी आणि विभुतवाडी (ता. आटपाडी) यांचा समावेश आहे.तेरा गावे कायमस्वरुपी संवेदनशील आहेत. मिरज तालुक्यातील म्हैसाळ, आसंगी तुर्क, देवनूर (ता. जत), बागणी (ता. वाळवा), शिरसी, आंबेवाडी (ता. शिराळा), जांभुळवाडी (ता. कवठेमहांकाळ), साळशिंगे (ता. खानापूर), येवलेवाडी, अमरापूर, शिरसगाव (ता. कडेगाव) आणि शेटफळे (ता. आटपाडी) या गावांचा समावेश आहे.
डेंग्यूचे २०१७ मध्ये ३३३ रुग्ण संशयित होते, त्यांची तपासणी केली असता, ५८ जणांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले. मे २०१८ मध्ये १२७ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील २६ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. २०१७ मध्ये डेंग्यूसदृश २१४ रुग्णांची तपासणी करण्यात आली होती, त्यातील ६२ रुग्णांना डेंग्यू असल्याचे स्पष्ट झाले.
मे २०१८ मध्ये १०८ रुग्णांची तपासणी केली असता, ३७ जण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. जनजागरण माहिमेसाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पाटील म्हणाले, हिवताप रोखण्यासाठी काही ग्रामपंचायतींकडे यंत्रे आहेत. गप्पी माशांचा वापर श्रेयस्कर ठरतो. जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे. लोकांनी झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, अंग उघडे टाकून झोपू नये, सायंकाळी ६ ते ८ वेळेत दारे-खिडक्या बंद कराव्यात, जाळ्याही बसवाव्यात.
डास न होण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. गटारी वाहत्या ठेवाव्यात, पाणी साठवायचे असेल तर बंद करून ठेवावे. टाक्या वेळोवेळी स्वच्छ कराव्यात, डास मारणे धोक्याचे आहे. आठवड्यातून एक दिवस ड्राय डे पाळावा, असे आवाहन केले.सात गावांत डासांचा उच्छादजिल्ह्यातील सात गावांत डासांची घनता सर्वाधिक आहे. पलूस तालुक्यातील भिलवडी १९.३६, अंकलखोप १९.२९, अमरापूर (ता. कडेगाव) ११.७६, नांद्रे (ता. मिरज) १६.१२, कसबेडिग्रज (ता. मिरज) १८.१८, मणेराजुरी (ता. तासगाव) १४.५१ आणि येळावी (ता. तासगाव) ११.१९ टक्के अशी डासांची घनता आहे.
शिराळा तालुक्यातील माळेवाडी येथे १३.२९ टक्के डासांची घनता होती, परंतु सध्या घनता कमी झाली असल्याचे प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी सांगितले.