सांगली : हमाली दरवाढीवरून आजच्या (शनिवार) तिसऱ्या दिवशीही हमालांचा संप सुरूच राहिला. मार्केट यार्डमध्ये हमालांनी आज ठिय्या आंदोलन केले. संपावर तोडगा काढण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मनोहर माळी यांनी व्यापारी व हमालांच्या प्रतिनिधींच्या बोलाविलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे हमालांचा संप सुरूच राहिला. संपामुळे गेल्या तीन दिवसात सुमारे ५० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. तीस टक्के हमाली वाढ देण्यात यावी, या मागणीसाठी ३१ डिसेंबरच्या सायंकाळपासून हमालांनी बेमुदत संप पुकारला आहे. व्यापाऱ्यांनी ९ टक्के हमाली वाढ देण्यास मंजुरी दिली आहे. मात्र हा प्रस्ताव अमान्य करुन हमालांनी संपाचे हत्यार उपसले आहे. आज दिवसभर मार्केट यार्डमध्ये हमालांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम म्हणाले की, संपाची सूचना आम्ही पंधरवड्यापूर्वीच दिली आहे. व्यापाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने नाईलाजाने संप करावा लागला. चर्चेसाठी आम्ही कधीही तयार आहोत. सांगलीमध्ये हमालीचा सर्वाधिक दर असल्याची दिशाभूल करणारी निवेदने व्यापाऱ्यांकडून दिली जात आहेत. हमाली वाढ होत नाही तोपर्यंत आमचा संप सुरूच राहणार आहे. हा संप व्यापाऱ्यांच्या भूमिकेमुळे लादला गेला आहे. हमालांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी प्रशासक मनोहर माळी यांनी आज सकाळी व्यापारी व हमाल प्रतिनिधींंची बैठक बोलावली होती. यावेळी व्यापारी व हमाल आपापल्या भूमिकेवर ठाम राहिले. तीस टक्के हमाली वाढीशिवाय संप मागे घेण्यास हमालांनी नकार दिला, तर व्यापाऱ्यांनी नऊ टक्के दरवाढ देण्यास मान्यता दिली. त्यामुळे संपावर निघू शकला नाही. यावेळी चेंबर आॅफ कॉमर्सचे प्रतिनिधी उपाध्यक्ष नितीन पाटील, अशोक पाटील, गोपाळ मर्दा, रमणिक दावडा, बी. एल. पाटील, तर हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम, बाळासाहेब बंडगर, गोविंद सावंत, यशवंत सावंत आदी उपस्थित होते. हमालांच्या संपामुळे मार्केट यार्डमधील सुमारे ५० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. हळद, गूळ यांचे सौदे होऊ शकले नाहीत. बाहेरील राज्यातून येणारा शेतीमालही येऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
सांगलीत ५० कोटींची उलाढाल ठप्प
By admin | Published: January 04, 2015 12:55 AM