शिरढोण/ढालगाव : घोरपडी (ता. कवठेमहांकाळ) येथे वीज पडून बापू अर्जुन नरळे (वय ३८, रा. घोरपडी) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (दि. ११) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.बापू नरळे मंगळवारी सकाळी आपल्या शेतात काम करत होते. दुपारी वीज व पावसाची लक्षणे दिसताच दुचाकीवरून (एमएच १० सीके ४२४४) घरी येऊ लागले. शेतापासून थोड्याच अंतरावर जोरदार वीज कडाडली. विजेचा कल्लोळ इतका तीव्र होता की त्यामुळे कवठेमहांकाळ शहरासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या अक्षरश: कानठळ्या बसल्या. विजेचा लोळ अंगावर कोसळल्याने नरळे यांचा जागीच मृत्यू झाला.परिसरातील शेतकऱ्यांनी दुर्घटनेची माहिती नरळे यांच्या कुटुंबीयांना व ग्रामस्थांना दिली. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. कवठेमहांकाळ येथील ग्रामीण रुग्णालयात नरळे यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. तलाठी प्रमोद साठे, ग्रामसेवक स्वाती मस्के, पोलीस पाटील कविता नारळे यांच्यासह ग्रामस्थ दिलीप सरगर, अशोक जाधव, मधुकर धायगुडे, चंद्रकांत जाधव यांनी पंचनामा केला. नरळे यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. कुटुंबीयांना शासनाने त्वरित मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली.
सांगली: वीज कोसळून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, घोरपडी येथे घडली दुर्देवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 4:49 PM