मिरज : हज यात्रेकरूंच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी एजंट हा यात्रेकरुंची रक्कम परत देण्याची बतावणी करीत परदेशात पलायनाच्या तयारीत असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. त्यामुळे हवालदिल यात्रेकरूंनी त्या एजंटाचा पासपोर्ट ताब्यात घेण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. फसवणूक झालेले यात्रेकरू पोलीस ठाण्यात दररोज चकरा मारत आहेत.इरफान नामक एजंटाने शहरात टुर्स अॅँँड ट्रॅव्हल्सचे दुकान थाटून मुंबईतील एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या माध्यमातून अनेक हज यात्रेकरूंकडून प्रत्येकी अडीच लाख याप्रमाणे सुमारे तीन कोटींची रक्कम घेतली. यात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील यात्रेकरुंचा समावेश आहे.
यात्रेकरूंचा व्हिसा न आल्याने फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. यात्रेकरुंनी पोलिसात धाव घेतल्यानंतर ट्रॅव्हल्सचा संचालक व एजंट इरफान हे जबाबदारी एकमेकांच्या अंगावर ढकलत असल्याने, यात्रेकरु संभ्रमात आहेत.गेल्या काही दिवसांपासून हा घोळ सुरु असताना, एजंटाने यात्रेकरूंची रक्कम परत देण्याची तयारी दाखवत काही जणांना धनादेश दिले. मात्र एजंट इरफान याचे आखाती देशात नातेवाईक असल्याने, पोलीस कारवाई आणि यात्रेकरुंचा तगादा चुकविण्यासाठी तो परदेशात पळून जाणार असल्याच्या संशयावरुन त्याचा पासपोर्ट ताब्यात घेण्याची मागणी यात्रेकरूंनी केली आहे.दरम्यान, रक्कम बुडण्याच्या भीतीने यात्रेकरु हवालदिल आहेत. एजंटाने यात्रेकरूंची रक्कम परत न दिल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.