सांगली : अखंडित वीज आणि वीज पुरवठा खंडित करण्याच्या महावितरणच्या भूमिकेविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.सांगली ते आष्टा रस्त्यावर लक्ष्मी फाटा येथे शेकडो कार्यकर्त्यांनी दुपारी साडेअकरा वाजता रास्ता रोको केला. यावेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. रास्ता रोको आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय बेले, बाबासाहेब सांदरे, मुकेश चिंचवाडे, रमेश पाटील, उत्कर्ष बेले, प्रदीप आडमुठे, सागर बिरणाळे, दीपक मगदूम यांच्यासह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. मोठा पोलीस बंदोबस्त असल्यामुळे दहा मिनिटांत कार्यकर्त्यांना रस्त्यावरून हटवून वाहतूक सुरळीत केली.पलूस येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा तर विटा येथे स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. इस्लामपूर, जत, तासगाव, आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ, शिराळा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून शेतकऱ्यांच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधून घेतले.
‘स्वाभिमानी’कडून जिल्ह्यात रास्ता रोको, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 4:24 PM