सांगली : कोरोनामुळे आलेले निर्बंध आणि सार्वजनिक उत्साहावर मर्यादा असतानाही बुधवारी सांगलीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातूनच साजरी करण्यात आली. मिरवणुकीस परवानगी नसल्याने घरात थांबूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांनीही मास्कच्या वापरासह सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रशासनाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त घरात थांबूनच जयंती साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास शहरातील नागरिकांनी प्रतिसाद दिला.
सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमास निर्बंध असले तरी नागरिकांनी घरात प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
शहरातील लालबहादूर शास्त्री चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादनासाठी दरवर्षी गर्दी असते. यंदाही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नागरिकांनी अभिवादन केले. मिरवणूक व सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी असली तरी हा परिसर सजविण्यात आला होता. दिवसभरात सामाजिक, राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. कोरोनामुळे गर्दी न करता घरातच राहून जयंती साजरी करत नागरिकांनी सामाजिक भान जपले.