कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील साडेसातशे उद्योजकांना महावितरण कंपनीकडून उशिरा विद्युत बिले मिळाली आहेत. वीज बिले वेळेत मिळावीत, अशी मागणी कृष्णा व्हॅली चेंबरच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना अध्यक्ष सतीश मालू व शिवाजी पाटील यांनी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कुपवाड एमआयडीसीत साडेसातशेपेक्षा जादा उद्योग आहेत. काही उद्योजकांना महावितरणकडून मिळालेल्या बिलावर बिल भरण्याची अखेरची मुदत २४ सप्टेंबर २०१८ अशी आहे. परंतु ही बिले उद्योजकांना २८ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी चार वाजता मिळालेली आहेत.
मुदत संपल्यानंतर वीज बिले उद्योजकांना मिळाली. त्यानुसार कृष्णा व्हॅली चेंबरने व काही उद्योजकांनी ही बिले दंडाच्या रकमेसह भरलेली आहेत. महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे उद्योजकांना नाहक दंडाची रक्कम भरावी लागत आहे. याला महावितरण कंपनीच जबाबदार आहे. ही बिले उशिरा मिळत असल्याने उद्योजकांना रिबेटची रक्कम मिळत नाही. त्यामुळे उद्योजकांना विनाकारण आर्थिक फटका बसत आहे. याबाबत महावितरणचे ठेकेदार महिकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही.
उद्योजकांना उशिरा विद्युत बिले मिळतात, अशी लेखी तक्रार कृष्णा व्हॅली चेंबरने आपल्याकडे वेळोवेळी केली होती. तसेच २५ मे २०१८ रोजी कृष्णा व्हॅली चेंबरमध्ये याविषयी अधिकारी व उद्योजकांची बैठकही आयोजित केली होती. अधिकाºयांनी, बिले वेळेवर दिली जातील असे आश्वासन दिले होते. परंतु त्या आश्वासनाचा विसर अधिकाºयांना पडलेला आहे. येथून पुढे वेळेवर बिले न मिळाल्यास कंपनीच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही मालू यांनी दिला आहे.