संग्रहित फोटो वापरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू झालेल्या २१ दिवसांच्या अभूतपूर्व लॉकडाऊनला आज, मंगळवारी (दि. २३) एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभरात सांगलीकरांनी प्रचंड त्रास आणि नुकसान सोसले, तरीही त्यातून शहाणपणा मिळविल्याचे दिसून येत नाही. बेजबाबदार नागरिकांमुळे गेल्या पंधरा दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू वाढली असून जिल्ह्यात कोरोना धोक्याच्या उंबरठ्यावर आहे.
सांगलीकरांना आयुष्यभर विसरता येणार नाही, असा धडा देणाऱ्या कोरोनाला लोकांनी अजूनही अगदीच हलक्यात घेतल्याचे बाजारातील गर्दीवरून दिसून येते. गेल्या आठवडाभरात दररोजची रुग्णसंख्या दोनशेच्या घरात पोहोचली आहे. वर्षभरात १७७३ व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला. हजारोंना रोजगारावर नोकऱ्यांवर पाणी सोडावे लागले. बाजारपेठांचे कंबरडे मोडले, तर औद्योगिक वसाहतीची चक्रे अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. कृषिक्षेत्राची हानीही भरून निघालेली नाही. जत्रा-यात्रा रद्द झाल्याने लोककला, यात्रेतील व्यावसायिकांचा सुपडासाफ झाला. हॉटेल्सना सूर सापडलेला नाही. चित्रपटगृहांतील संख्येवर मर्यादा आल्या आहेत.
लॉकडाऊनमुळे जिल्ह्याची महसुली यंत्रणा पूर्णत: ठप्प झाली. विकासकामांचा ६७ टक्के निधी आरोग्य क्षेत्राकडे वळता झाला. जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयांची सारी यंत्रणा कोरोनाच्या बंदोबस्तात गुंतली, त्याचा थेट परिणाम विकासकामांवर झाला. साखर कारखाने, कृषी व अैाद्योगिक निर्यात, पर्यटन या साऱ्याला खो बसला.
चौकट
काय गमावले?
गेल्या वर्षभरात एकही सण मुक्तपणे साजरा करता आला नाही. बाजारपेठांत सुतकी वातावरणच राहिले. जिल्ह्याच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलणारी अनेक कर्तृत्ववान माणसे कोरोनाने आपल्यातून नेली, त्याचे मोल करताच येणार नाही.
चौकट
काय मिळविले?
आरोग्यासंदर्भातील जागरूकता ही एकमेव कमाई वर्षभरात झाली. कोरोनामुळे अन्य आजार झपाट्याने कमी झाले. आरोग्यावरील खर्च व सजगता वाढली. सरकारी रुग्णालये अपडेट झाली. खासगी रुग्णालयांनीदेखील साथीच्या रोगांना तोंड देण्यासाठी सज्ज झाली.
चौकट
वर्षभरात १७७३ जणांनी जग सोडले
वर्षभरात ४९ हजार ६२६ जण कोरोनाबाधित झाले. १७७३ जण प्राणास मुकले, ४७ हजार ५९ रुग्ण बरे झाले. महापालिका क्षेत्रात १७ हजार ११३, तर ग्रामीण भागात २५ हजार ११९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. वर्ष पूर्ण झाल्यानंतरही कोरोना जिल्ह्यातून हद्दपार झालेला नाही, उलट ७९४ जण अजूनही उपचार घेत आहेत.
पॉइंटर्स
- उद्योग, व्यापार व सेवाक्षेत्राचे नुकसान : सुमारे दहा हजार कोटी
- एसटी, रेल्वे व खासगी वाहतूक क्षेत्राला फटका : एक हजार कोटी
- कृषिक्षेत्राची हानी : सुमारे २० हजार कोटी