सांगली : पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचे शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून अद्यापही भरती प्रक्रीया सुरू केलेली नाही. लोकसभा निवडणूकीअगोदर पात्र तरूणांना नियुक्तीपत्र देण्याचे आश्वासन शासन देत असलेतरी प्रत्यक्षात बिंदू नामावलीसह अनेक प्रक्रीया प्रलंबीत असल्याने प्रशासनाने ही प्रक्रीया तातडीने पूर्ण करावी, या मागणीचे निवेदन पवित्र शिक्षक संघर्ष समितीच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले.जिल्ह्यातील डीएड, बीएडधारक तरूणांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांच्यासह अधिकाऱ्यांची भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या. अर्जून सुरपल्ली यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेत भरतीची मागणी केली.निवेदनात म्हटले आहे, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद शाळांतील सर्व रिक्त जागांवर पवित्र पोर्टलमार्फत जागा भरण्यात याव्यात व त्यास प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी ठराव मंजूर करण्यात यावा, जिल्ह्यातील अनेक प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागा असल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शंभर टक्के रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर भरण्यात यावी,
बिंदुनामावली दिलेल्या मुदतीत अद्यावत करतू पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्वच रिक्त जागा पवित्र पोर्टलवर अपलोड केल्यास विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमधील सहावी ते आठवी वर्गासाठी विषय शिक्षकांची रिक्त पदे अपलोड करण्यात यावीत यासह दिलेल्या मुदतीत भरतीप्रक्रीया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी अर्जून सुरपल्ली, राहुल माने, भिमराव शिंदे, कृष्णा रोकडे, अमोल सुर्यवंशी, म्हाळाप्पा पडवळे, राजाराम खोत, युवराज हुलवान, रवींद्र लोंढे, वसंत कलगुडे यांच्यासह जिल्हाभरातून आलेले डीएड, बीएडधारक तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.