सांगली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात कडकनाथ कोंबड्या सोडू पाहणाऱ्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची पोलीसांनी धरपकड केली. पकडून पोलीस ठाण्यात नेले. कार्यकर्त्यांनी पोलीसांवरच कोंबड्या उधळल्या.माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या किसान आत्मनिर्भर यात्रेची सांगता इस्लामपुरातील गांधी चौकात रविवारी होती. यासाठी फडणवीस जिल्हा दौऱ्यांवर येणार होते. त्यांच्या सभेत कडकनाथ कोंबड्या उधळण्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेने दिला होता. त्यासाठी कडकनाथ संघर्ष यात्राही आयोजित केली होती.
सदाभाऊ खोत यांनी आत्मनिर्भर यात्रेदरम्यान स्वाभीमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावरही जोरदार टिका केली होती. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी कडकनाथ संघर्ष यात्रा आयोजित केली. या पार्श्वभूमीवर शहर पोलीसांनी दुपारी सांगलीत स्टेशन चौकात कार्यकर्त्यांची धरपकड केली.
इस्लामपुरकडे कूच करु पाहणाऱ्या कार्यकर्त्यांची नाकेबंदी केली. जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांनी सभेत उधळण्यासाठी सोबत आणलेल्या कडकनाथ कोंबड्या हिसकावण्याचा प्रयत्न केला असता, त्या पोलिसांवरच उधळल्या. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांची झटापटही झाली. पंचवीसभर कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.