सांगली ,दि. ३१: लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, हे तत्व मांडतानाच बळीराजाचे महत्त्व, त्याच्यासमोरील समस्या आणि अंध:कारमय भविष्य अशा सर्व गोष्टींना स्पर्श करणारा एक लघुपट सांगलीच्या कलाकारांनी नुकताच साकारला आहे. विशेष म्हणजे यासाठी हजारो रुपये खर्च करूनही शेतकऱ्यांचे व समाजाचे प्रबोधन व्हावे म्हणून हा लघुपट सोशल मिडियावर मोफत व्हायरल करण्यात आला आहे.
सांगलीतील कवी व एकपात्री प्रयोग करणारे कलाकार वृषभ आकिवाटे यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे. त्यांनी लघुपटाचे प्रकाशन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा .राजू शेट्टी यांच्या ऊस परिषदेतच केले. शेट्टी यांनी हा लघुपट पाहिला होता. त्यामुळे त्यांनी ऊस परिषदेतच शेतकऱ्याना तो लघुपट जाणीवपूर्वक पाहण्याची विनंती केली.
शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळाला पाहिजे. जगाला जगवणाऱ्या शेतकऱ्याच्या जीवनात सुरू असलेल्या विचित्र घडामोडी आणि त्यातून त्याची चाललेली जगण्याची धडपड हा धागा पकडून लघुपट अत्यंत चांगल्या पद्धतीने रंगविला आहे. वास्तवदर्शी असलेला हा लघुपट शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे. हा लघुपट विराज प्रोडक्शनने सादर केला आहे.
आप्पासो आकिवाटे, कमल आकिवाटे हे निर्माते आहेत . दिग्दर्शन सचिन कांबळे यांनी केले असून लेखन वृषभ आकिवाटे, प्रा .पी. बी.पाटील यांनी केले आहे . कॅमेराची धुरा शीतल पाटील यांनी सांभाळली आहे. स्थानिक कलाकारांना या लघुपटात संधी देण्यात आली आहे .