सांगली : कुरळप येथील एका आश्रमशाळेत मुलींचे लैगिंक शोषण केल्या प्रकरणी अटकेत असलेला शाळेचा संस्थापक अरविंद आबाजी पवार (वय ६० वर्ष) याच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरुवारी (27 सप्टेंबर) कुरळप गाव बंद ठेवले होते. दरम्यान अटकेतील संशयित पवारसह शाळेतील स्वयंपाक कर्मचारी मनीषा कांबळे हिला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनवली आहे. पोलिसांनी पुन्हा छापा टाकून आश्रमशाळेची झडती घेतली. तिथे शिक्षण घेणा-या ७० मुलींना विश्वासात घेऊन चौकशी केली. कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली.
पीडित मुलींशी संवाद साधला. कुरळप पोलीस ठाण्यास भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्याकडून तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणाची मुळापर्यंत जाऊन चौकशी करावी. कुणाचीही गय करु नका; जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे आदेश नांगरे-पाटील यांनी कुरळप पोलिसांना दिले आहेत. कुरळपच्या वारणा-मोरणा शिक्षण संस्थेच्या मिनाई आश्रमशाळेत गेल्या अनेक वर्षापासून मुलींचे लैंगिक शोषण सुरु होते. काही मुलींनी धाडसाने कुरळप पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांच्या नावाने पत्र पाठवून आश्रमशाळेचा संस्थापक अरविंद पवार याच्याकडून होत असलेल्या अत्याचाराची माहिती कळविली.
त्यानंतर पोलिसांनी आश्रमशाळेवर छापा टाकला. दोन तास आश्रमशाळेची झडती घेतली. संशयित पवारच्या निवासी खोलीत उत्तेजक औषधे व अश्लील सीडी सापडल्याने त्या जप्त करण्यात आल्या आहेत. गावातील आश्रम शाळेतील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने ग्रामस्थ संतप्त बनले. त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ गाव बंद ठेवले. कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी गावात व तसेच आश्रमशाळेजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनेक मुलींच्या पालकांनी आश्रम शाळेकडे धाव घेऊन स्वत:च्या मुलींची गळाभेट घेऊन चौकशी केली.
कुरळप पोलिसांनी आश्रमशाळेवर पुन्हा छापा टाकून झडती घेतली. यामध्ये संशयास्पद काहीच सापडले नाही. आश्रमशाळेत पहिली ते बारावीपर्यंत अडीचशे मुले-मुली शिक्षण घेत आहेत. यामध्ये ७० मुली आहेत. या सर्व मुलींकडे महिला पोलिसांच्या पथकाने चौकशी केली. संशयित पवार हा आश्रयशाळेत कधी येत असे? तो मुक्कामाला दररोज राहत होता का? स्वयंपाकी कर्मचारी मनिषा कांबळे हिचे वर्तन कसे होते? ती मुलींना पवारकडे कधी पाठवित असे? याबद्दल चौकशी केली. अटकेतील पवार हा शिवसेनेचा शिराळ्याचा माजी तालुकाप्रमुख आहे. त्याला व मनिषा कांबळे या दोघांना पोलीस बंदोबस्तात न्यायालयात उभे करण्यात आले होते.
पाच मुलींवर अत्याचारआश्रमशाळेतील नऊ ते अकरा वयोगटातील आठ मुलीवर पवारने अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पिडित मुलींची रात्री उशिरा वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये पाच मुलींवर अत्याचार, तर तीन मुलींचा विनयभंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयित पवारविरुद्ध बलात्कार, विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत पवारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.