सांगली विधानसभेचा हलता पट.. सर्वपक्षीयांचा झेंडा; काँग्रेसचे २३ वर्षे वर्चस्व 

By अविनाश कोळी | Published: October 23, 2024 06:01 PM2024-10-23T18:01:58+5:302024-10-23T18:02:41+5:30

पंधरा वर्षे भाजपच्या ताब्यात

Sangli Assembly Constituency has been under the control of Congress for 23 years With no exceptions, candidates of different parties consistently won | सांगली विधानसभेचा हलता पट.. सर्वपक्षीयांचा झेंडा; काँग्रेसचे २३ वर्षे वर्चस्व 

सांगली विधानसभेचा हलता पट.. सर्वपक्षीयांचा झेंडा; काँग्रेसचे २३ वर्षे वर्चस्व 

अविनाश कोळी

सांगली : क्रीडा स्पर्धांमधील फिरत्या चषकाप्रमाणे सांगली विधानसभेच्या सत्तेचा पट सतत फिरता राहिला. मतदारसंघाच्या स्थापनेनंतर सुरुवातीला २३ वर्षे काँग्रेसच्या ताब्यात असलेला हा बालेकिल्ला एका निवडणुकीचा अपवाद वगळता सतत वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांनी जिंकला. गेली पंधरा वर्षे तो भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे पक्षीय गणितापेक्षा उमेदवाराच्या प्रभावाचे गणित याठिकाणी कामी येत असल्याचे दिसून येते.

सांगली विधानसभा मतदारसंघाची पहिली निवडणूक दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी जिंकली होती. त्यानंतर सतत उमेदवारांची अदलाबदल करीत २३ वर्षे काँग्रेसचेच उमेदवार या जागेवर निवडून आले. त्यानंतर जनता पक्ष, जनता दल, अपक्ष, भाजप यांनी आलटून पालटून येथे विजय मिळविला. १९८६ नंतर कोणत्याही पक्षाला दीर्घकाळ या मतदारसंघावर वर्चस्व राखता आले नाही. त्यामुळे हा मतदारसंघ पक्षापेक्षा उमेदवार कोण, यावर विजयाचे गणित मांडणारा ठरत गेला.

संभाजी पवारांची हॅटट्रिक

सांगली विधानसभा मतदारसंघात १९६२, १९७८ व १९८५ या तीन निवडणुकांत वसंतदादा पाटील यांनी बाजी मारली. मात्र, सलग तीन निवडणुका जिंकून हॅटट्रिक नोंदविण्याचा मान केवळ संभाजी पवार यांना मिळाला. त्यांनी १९८६ची पोटनिवडणूक, १९९० व १९९५ ची निवडणूक जिंकत त्यांनी विक्रम केला. पोटनिवडणूक जनता पक्षाच्या तिकिटावर, तर अन्य दोन निवडणुका त्यांनी जनता दलाच्या तिकिटावर जिंकल्या. विशेष म्हणजे २००९ मध्ये पुन्हा विजय मिळवित या मतदारसंघात सर्वाधिक वेळा आमदारकी मिळविणारे ते एकमेव ठरले.

सलग तीन निवडणुकांत भाजपचे वर्चस्व

सांगलीत २००९ पासून आजअखेर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. २००९ ची निवडणूक संभाजी पवार यांनी भाजपच्या माध्यमातून जिंकली. त्यानंतर २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे सुधीर गाडगीळ विजयी झाले.

अपक्ष उमेदवाराचाही झेंडा

राष्ट्रवादीकडून तिकीट नाकारल्यानंतर २००४ मध्ये मदन पाटील यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळविला होता. या निवडणुकीपूर्वी व नंतर कोणत्याही अपक्ष उमेदवाराला यश मिळविता आले नाही.

काँग्रेसचा स्ट्राइक रेट ५० टक्के

मतदारसंघात आजवर एका पोटनिवडणुकीसह १४ निवडणुका झाल्या. यातील सात निवडणुका काँग्रेसने जिंकल्याने येथील त्यांचा स्ट्राइक रेट ५० टक्के इतका दिसतो. भाजपचा स्ट्राइक रेट २१ टक्के इतका आहे.

Web Title: Sangli Assembly Constituency has been under the control of Congress for 23 years With no exceptions, candidates of different parties consistently won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.