- शीतल पाटील सांगली - सांगली-तासगाव रस्त्यावरील बुधगाव नाका परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चोरीचा प्रयत्न झाला. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता ही घटना उघडकीस आली. दोघे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले. बँकेतील रोकड सुरक्षित आहे. शाखाधिकारी प्रीती अभय मांजरेकर यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सांगली-तासगाव रस्त्यावरील बुधगाव नाका परिसरातील मुख्य रस्त्यावर स्टेट बँकेची शाखा आहे. या शाखेत वीस लाखांपर्यंतची रोकड लॉकरमध्ये ठेवली जाते. दसऱ्यानिमित्त सुटी असल्याने सोमवारी रात्री आठच्या सुमारास बँक बंद करण्यात आली होती. बँकेला सुटी असल्याची पाळत ठेवून चोरट्याने मागील बाजूस असणाऱ्या जागेतून बँकेत प्रवेश केला. रात्रीच्यावेळी बॅटरी हातात घेवून चोरटे शाखेत फिरत होते. रोकड असणाऱ्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था असल्याने ते फोडता आले नाही. बुधवारी सकाळी बँक उघडल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी कळवण्यात आले. पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयितांच्या शोधासाठी तातडीने पथके रवाना केली.