सांगली : दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस खडड्यात आदळल्याने २५ बसमधील २५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. सांगली-इस्लामपूर रस्त्यावर कसबे डिग्रज फाट्यावर मंगळवारी सकाळी हा अपघात झाला. बसचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. तासभराच्या बचाव कार्यानंतर प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.
एसटी बस (क्र. एमएच १४ बीटी-३३६७) साताराहून मिरजेला येत होती. कसबे डिग्रज फाट्यावर बस आल्यानंतर दुचाकीस्वार अचानक आडवा आला. चालकाने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ताबा सुटल्याने बस थेट रस्त्याच्याकडेच्या खडड्यात जाऊन उलटी झाली. बसचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. तरीही बसमधील २५ प्रवासी किरकोळ जखमी झाले.
अपघातानंतर चालक कसाबसा दरवाजा उघडून बाहेर पडला. स्थानिक नागरिकांनी प्रवाशांना खिडकीतून बाहेर काढण्यात आले. मदतीचे बचावकार्य तासभर सुरु होते. सांगली ग्रामीण पोलीस तसेच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.