सांगली : सांगलीबाजार समिती निवडणुकीतील उमेदवारी वाटपावरून भाजपचे खासदार संजय पाटील आणि जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यात वाद निर्माण झाला आहे. जत सोसायटी गटातील उमेदवाराचे नाव खासदारांनी परस्पर बदलल्याचा आरोप करून जगताप भाजपच्या पॅनलमधून बाहेर पडले आहेत.महाविकास आघाडी आणि भाजप पॅनलच्या उमेदवारांची नावे शुक्रवारी प्रसिद्ध केली, यादीनंतर भाजप नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. जगताप यांनी सोसायटी गटातून जत तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत यांचे नाव निश्चित केले होते, पण हे नाव बदलून संजय पाटील आणि प्रकाश जमदाडे यांच्या गटाने बिळूर गटातील चिदानंद चौगुले यांना उमेदवारी दिली. यादीत बदल केल्याची माहिती समजताच जगताप यांनी संताप व्यक्त करत भाजप पॅनलमधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले.मी आणि माझे नातू संग्राम जगताप भाजपच्या पॅनलवर बहिष्कार घालून निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असल्याचे विलासराव जगताप यांनी जाहीर केले.खासदारांचे विश्वासघातकी राजकारण : विलासराव जगतापसोसायटी गटातून जत तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत यांच्या उमेदवारीस सर्व नेत्यांनी सहमती दिली होती. त्यानंतर खासदारांनी परस्पर सावंत यांची उमेदवारी रद्द केली. त्यांच्या याच विश्वासघातकी राजकारणाला आम्ही कंटाळलो आहे. भाजपच्या उमेदवार यादीवर बहिष्कार घालून आम्ही स्वतंत्र लढणार आहोत, अशी प्रतिक्रिया विलासराव जगताप यांनी दिली.विलासराव जगतापांना भाजपबरोबर यायचेच नव्हते : संजय पाटीलविलासराव जगताप यांनी गेल्या वर्षभरापासून चुकीच्या पद्धतीने राजकारण सुरू केले आहे. पक्षाची शिस्त म्हणून मी त्यांच्या आरोपाला उत्तर दिले नाही, पण बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांच्या कार्यकर्त्याची उमेदवारी मी रद्द केल्याचा ठपका ठेवून बाहेर पडण्याचे ते नाटक करीत आहेत. त्यांना भाजपमध्ये थांबायचेच नव्हते, म्हणून फक्त उमेदवारीचे कारण शोधले आहे, असा आरोप खासदार संजय पाटील यांनी केला.
सांगली बाजार समिती निवडणूक: भाजपच्या पॅनेलमधून माजी आमदार विलासराव जगताप बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 4:43 PM