अशोक डोंबाळेसांगली : भाजपचे खासदार संजय पाटील यांनी सांगली बाजार समिती, कवठेमहांकाळ नगरपंचायत आणि पंचायत समितीत विरोधकांचे बहुमत असतानाही सत्तांतर केले. याच ‘संजयकाका पॅटर्न’मुळे काही नेत्यांनी सांगली बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे माजी मंत्री अजितराव घाेरपडे, जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांचे लक्ष आहे.बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली असून, दि. ३० एप्रिलरोजी मतदान आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून प्राथमिक चर्चा सुरू आहेत. आ. जयंत पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील (अंजनी), घोरपडे, जगताप यांचे एक पॅनेल होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते व माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या स्वतंत्र पॅनेलची चर्चा आहे. भाजपचे खासदार पाटील, पालकमंत्री सुरेश खाडे काय निर्णय घेतात, याकडे भाजपच्या नेत्यांचे लक्ष आहे. बाजार समितीची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर होणार नाही, त्यामुळे सर्वच पक्षांचे नेते सोयीच्या आघाडीत सहभागी होतील, असे सध्याचे चित्र आहे.मागील निवडणुकीत दिवंगत ज्येष्ठ नेते पतंगराव कदम आणि घोरपडे समर्थकांचे बहुमत होते. पण, त्यानंतर बाजार समितीत सत्तेचा बाजार झाला. खा. पाटील यांनी काही संचालकांना हाताशी धरून त्यांचे समर्थक दिनकर पाटील यांना सभापती केले. पुढे दिनकर पाटील राष्ट्रवादीत गेले. सत्तेच्या या बाजारावर घोरपडे, जगताप यांनी संताप व्यक्त केला आहे. कवठेमहांकाळ पंचायत समिती आणि नगरपंचायतीमधील सत्तांतराची सल घोरपडे यांना असल्यामुळे ते खा. पाटील यांच्याबद्दल सावध भूमिका घेतील. घोरपडे यांच्या भूमिकेप्रमाणे जगतापही खासदारांच्या भूमिकेला कंटाळले आहेत. त्यामुळे खासदार असतील तेथे न जाण्याची अलिखित भूमिका घोरपडे व जगताप यांनी घेतली आहे.
गद्दारांना उमेदवारी नाही : अजितराव घोरपडेनिवडून आणायचे आम्ही आणि नंतर दुसरीकडे जाणाऱ्या गद्दारांना बाजार समितीसाठी उमेदवारी देणार नाही. प्रामाणिक, निष्ठावंतालाच संधी दिली जाईल, अशी स्पष्ट भूमिका अजितराव घोरपडे यांनी मांडली. गद्दारी करणाऱ्या नेत्यांच्या संगतीलाही आपण जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
कुरघोड्यांच्या राजकारणापासून सावध : विलासराव जगतापउमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही शक्ती पणाला लावतो, निवडून आल्यानंतर दुसराच नेतृत्व करतो, हे यापुढे खपवून घेणार नाही. सांगली बाजार समितीची निवडणूक पक्षीय चिन्हावर होणार नाही. समविचारी नेतृत्वाबरोबर आघाडी करून पॅनेल तयार होईल, अशी प्रतिक्रिया विलासराव जगताप यांनी दिली.