लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २७ रोजी होणार आहे. या सभेत माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे संचालक बाजार समितीमधील २२ कर्मचाºयांच्या पदोन्नतीमधील तडजोडीचा मुद्दा उचलून धरून सत्ताधाºयांना घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत. वास्तविक पदोन्नतीचा मुद्दा किरकोळ असला तरी, याला खासदार संजयकाका पाटील आणि अजितराव घोरपडे यांच्यातील संघर्षाची किनार आहे. दोन नेत्यांमधील टोकाला गेलेला संघर्षच यातून पुढे येणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
बाजार समितीची वार्षिक सभा दि. २७ रोजी होत आहे. या सभेत कर्मचाºयांची पदोन्नती आणि जमा-खर्च, लेखापरीक्षणातील अहवाल ठेवण्यात येणार आहे. मागील सभेत सत्ताधारी गटाला घोरपडे यांच्या नाराजीचा सामना करावा लागला होता. संचालकांमध्ये खडाजंगीही झाली होती. बाजार समितीच्या विरोधात पणनमंत्री आणि पणन संचालकांकडेही अनेक तक्रारी झाल्या आहेत. शिवाय, बाजार समितीच्या विविध कार्यक्रमालाही घोरपडे यांना डावलण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सभेत कोणताही गोंधळ होऊ नये, म्हणून संचालक मंडळाने वार्षिक सभेला खासदार पाटील यांनाच प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले आहे. खासदार पाटील उपस्थित राहिल्यास घोरपडे गटाचे संचालक संघर्ष करणार नाहीत. तसेच सभाही शांततेत होईल, असा विद्यमान सत्ताधारी गटाचा समज आहे.
घोरपडे आणि खासदार पाटील यांच्यामध्ये मागील विधानसभा निवडणुकीपासून संघर्ष टोकाला आहे. वास्तविक घोरपडे आणि काका दोघेही भाजपमध्ये आहेत.लोकसभा निवडणुकीत दोन्ही नेते एकमेकांच्या गळ्यात गळे घालून होते पण, विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये टोकाचा संघर्ष झाला. दि. २३ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या निवडीत बाजार समिती सभापतिपदावर घोरपडे गटाला डावलून माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी प्रशांत शेजाळ यांची वर्णी लावली. शेजाळ यांच्या निवडीला खासदार पाटील यांचाही पाठिंबा होता. शेजाळ आणि घोरपडे यांचे फारसे जमत नाही. येथूनच घोरपडे आणि खासदार पाटील गटातील संघर्ष आणखी वाढला.
संचालकांच्या पळवापळवीत सुगलाबाई बिराजदार यांचे संचालकपदही अडचणीत आले. पुढे घोरपडे गटाकडून बाजार समितीमधील प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष होते. बाजार समितीने उमदी येथे खरेदी केलेल्या जमीन खरेदी प्रकरणातही सत्ताधाºयांना घोरपडेंनी अडचणीत आणले होते. अखेर सत्ताधाºयांनी जमीन खरेदीच रद्द करून वादावर पडदा टाकला.
कर्मचाºयांना पदोन्नती देऊन त्यांना फरकाची रक्कम दिल्याच्या मुद्द्यावरूनही घोरपडे समर्थकांनी पणन संचालकांकडे तक्रार दाखल केली आहे.घोरपडे गटाने राष्ट्रवादीशी जुळवून घेतले आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत त्याचा घोरपडे गटाला फायदाही झाला आहे. दोन नेत्यांमधील संघर्ष टोकाला गेल्यामुळे सत्ताधारी गटाकडून बाजार समितीच्या कोणत्याही कार्यक्रमास घोरपडे गटाला निमंत्रितच केले जात नाही. यामुळेही पुन्हा काका-घोरपडे यांच्यातील संघर्ष मिटण्याऐवजी वाढतच गेला आहे. याच दोन नेत्यांमधील वाढत गेलेला दुरावा बाजार समितीमधील संघर्षाची ठिणगी आहे.