सांगली : सांगली मार्केट यार्ड, विष्णूअण्णा फळ मार्केट, मिरज, कवठेमहांकाळ, जत, माडग्याळ येथील व्यवहार महिनाभर बंद राहिल्यामुळे ३०० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे बाजार समितीचे उत्पन्न अडीच कोटींनी बुडाले आहे. उत्पन्न थांबल्यामुळे बाजार समिती प्रशासनाची आर्थिक कोंडी झाली आहे.
सांगली मार्केट यार्डात दिवसाला चार ते पाच कोटींची उलाढाल होती; पण कोरोनाचा फैलाव वाढल्यामुळे मागील महिन्यापासून हळद, गूळ आणि बेदाण्याचे सौदे बंद आहेत. धान्य, कडधान्य, मसाल्याची उलाढालही ठप्प झाली आहे. महिनाभरात जवळपास २०० कोटींची उलाढाल थांबली होती. विष्णूअण्णा फळ मार्केट येथे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होती. आंब्याच्या हंगामामध्येच फळ मार्केट बंद राहिल्यामुळे बाजार समितीला कराच्या माध्यमातून मिळणारे २५ लाखांचे उत्पन्न बुडाले आहे. मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील माडग्याळ येथील जनावरांचे बाजारही बंद राहिल्यामुळे जवळपास १० ते १५ लाखांचे उत्पन्न बुडाले आहे. सांगली बाजार समिती कार्यक्षेत्रातील उलाढाल ठप्प झाल्यामुळे कराचे अडीच कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. सांगली बाजार समितीला वार्षिक १४ ते १५ कोटींचे उत्पन्न मिळत होते. पण, या वर्षात वर्षभर कोरोनाचे संकट आहेच. यामुळे अडीच कोटींचे उत्पन्न बुडाल्यामुळे बाजार समितीच्या कराचे उत्पन्न वाढण्याऐवजी कमी झाले आहे. अकरा ते साडेअकरा कोटींच्या उत्पन्नातच बाजार समितीला प्रशासकीय खर्च भागवावा लागणार आहे. अन्य विकासकामे करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे.
चौकट
सलग दोन वर्षे बाजार समितीच्या उत्पन्नात घट
गेल्यावर्षीच्या लॉकडाऊनमध्ये बाजार समितीचे दोन कोटींपर्यंत उत्पन्न बुडाले होते, परंतु आंबा, फळांचा हंगाम सुरळीत झाल्यामुळे तोटा कमी झाला होता. यावर्षी डाळिंब, आंबा हंगामाची पूर्णता उलाढाल ठप्प झाल्यामुळे आणि मागील महिनाभर मार्केट यार्ड, कवठेमहांकाळ, मिरज, माडग्याळ येथील जनावरांचा बाजार बंद राहिल्यामुळे यावर्षी अडीच कोटींचे उत्पन्न सांगली बाजार समितीचे बुडाले आहे, अशी माहिती सांगली बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी दिली.