सांगली ,दि. ११ : उद्योगविश्वात वेगळी ओळख निर्माण करतानाच सामाजिक मार्गानेही वाटचाल करणारे उद्योगपती व गजानन विव्हिंग मिल्सचे मालक रामचंद्र विष्णुपंत वेलणकर यांना यंदाचा विश्व जागृती मंडळाचा सांगली भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अरुण दांडेकर यांनी दिली.
विविध क्षेत्रात सांगली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तिस दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. सांगलीतील हा मानाचा पुरस्कार समजला जातो. यंदा हा पुरस्कार रामचंद्र वेलणकरांना जाहीर करण्यात आला. रोख २५ हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
वेलणकर यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने सांगलीत उद्योगाचा पाया घालणाऱ्या वि. रा. वेलणकर यांचे रामचंद्र हे पुत्र आहेत. सध्या ते ९१ वर्षांचे आहेत.
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी ६३ वर्षे गजानन विव्हिंग मिल्सची जबाबदारी सांभाळली आहे. अनेक संकटातून हा उद्योग वाढवून त्यांनी या उद्योगात त्यांच्या मुलींनाही समावून घेतले.
राज्यातील कापड आणि सूत उद्योग सध्या अत्यंत अडचणीत आहे. रामचंद्र आणि त्यांच्या मुलींनी अशा परिस्थितीत अत्यंत जिद्दीने आणि योग्य नियोजनाने मिल्स चालविण्याची अवघड गोष्ट लिलया साध्य करून दाखविली.
उद्योगाबरोबरच चारित्र्य आणि नितीमूल्य जोपासण्यासाठी आपल्या वडिलांपेक्षाही जास्त कष्ट रामचंद्र यांनी घेतले. त्यांची सामाजिक जाणीवही अत्यंत तीव्र आहे. विविध सामाजिक कार्यात त्यांचा वेगळा ठसा दिसून येतो. प्रत्येक काम चिकाटीने आणि प्रामाणिकपणे करण्याचा मार्ग त्यांनी सोडला नाही.
गरिब आणि अनाथ मुलींसाठी कार्यरत असलेल्या वेलणकर अनाथ बालकाश्रम या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत लाखो रुपयांचे दान गरजू लोकांना दिले आहे.
कारखान्याचे नेतृत्वही त्यांनी मुलींना देऊन उद्योग क्षेत्रात नवा पायंडा पाडला आहे. त्यांच्या या सर्व कार्याला सन्मानित करण्याच्या उद्देशाने सांगली भूषण पुरस्कार देण्यात येत असल्याचे दांडेकर यांनी म्हटले आहे. आजवरचे पुरस्कारप्राप्त मान्यवरविश्व जागृती मंडळाने आजवर नेत्र विशारद भैय्यासाहेब परांजपे, खासदार आण्णासाहेब गोटखिंडे, प्रख्यात गायिका आशाा भोसले, राजमतीआक्का पाटील, माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, स्वातंत्र्यसैनिक धोंडीरामबापू माळी, उद्योगपती बाबुकाका शिरगावकर, कवी सुधांशू, गोवा स्वातंत्र्यसैनिक मोहन रानडे, नटवर्य मास्टर अविनाश, सुवर्ण व्यावसायिक दाजीकाका गाडगीळ, बुद्धिबळाचे भीष्माचार्य भाऊसाहेब पडसलगीकर, कृषीभूषण प्रं. शं. ठाकूर, क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड, अॅड. शशिकांत पागे, डॉ. एस. बी. कुलकर्णी, प्रा. पी. बी. पाटील, प्रा. म. द. हातकणंगलेकर, नानासाहेब चितळे, प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना सन्मानित केले आहे.