सांगली : बिसूर (ता. मिरज) येथील विकास बाळासाहेब पाटील (वय ३०) यांना लिफ्ट देऊन दुचाकीस्वार चोरट्याने लुटले. त्यांच्याकडील १३ ग्रॅमची सोनसाखळी हातोहात लंपास केली. माधवनगर (ता. मिरज) येथील बंद पडलेल्या कॉटन मिलच्या आवारात सोमवारी पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली.विकास पाटील पुण्यात नोकरीस आहेत. रविवारी रात्री कामानिमित्त गावी येण्यास निघाले होते. पहाटे ते सांगलीत आले. गावाकडे जाण्यास वाहन नसल्याने ते चालत कॉलेज कॉर्नरवर गेले. तेथून कोणते तरी वाहन मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. तेवढ्यात एका दुचाकीस्वार आला.
पाटील यांनी हात करताच दुचाकीस्वार थांबला. पाटील यांनी त्याला बिसूरला जाणार आहे, असे सांगितले. दुचाकीस्वाराने बसा म्हणून सांगितले. त्यामुळे पाटील दुचाकीवर बसले. माधवनगर सोडल्यानंतर दुचाकीस्वाराने दुचाकी थेट कॉटन मिलच्या गेटमधून आत घेतली.
मिलमधील झुडूपाजवळ नेऊन दुचाकी थांबविली. पाटील यांनी इकडे कुठे, असे म्हणताच दुचाकीस्वाराने तेथील दगड घेऊन मारहाण करण्याची धमकी देऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे १३ ग्रॅमची साखळी काढून घेऊन पलायन केले. या घटनेनंतर पाटील यांनी संजयनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.बोगस नावकॉलेज कॉर्नर ते माधवनगरपर्यंत पाटील यांनी या दुचाकीस्वाराशी संवाद साधला. त्यावेळी त्याने महेश साबळे, असे स्वत:चे नाव सांगितले. पाटील यांनी फिर्यादीत संशयित म्हणून तेच नाव दिले आहे. साधारपणे हा चोरटा ३२ वर्षाचा आहे. अंधार असल्याने पाटील यांना त्याच्या दुचाकीचा क्रमांक पाहता आला नाही. पण पाटील यांनी दिलेल्या वर्णनावरुन त्याचा शोध सुरु आहे.