सांगली महापालिकेच्या महासभेत गदारोळ, भाजप-काँग्रेस नगरसेवक महापौरांच्या अंगावर धावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 01:24 PM2022-04-19T13:24:20+5:302022-04-19T13:25:03+5:30

महापौरांनी पळ काढल्याचा आरोप करत सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. व्यासपीठावरील राजदंडही पळविला.

Sangli BJP Congress corporator ran towards the mayor | सांगली महापालिकेच्या महासभेत गदारोळ, भाजप-काँग्रेस नगरसेवक महापौरांच्या अंगावर धावले

सांगली महापालिकेच्या महासभेत गदारोळ, भाजप-काँग्रेस नगरसेवक महापौरांच्या अंगावर धावले

googlenewsNext

सांगली : महापालिकेच्या महासभेत सोमवारी इतिवृत्त मंजुरीवरून गदारोळ झाला. या गदारोळातच महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सभा गुंडाळल्याने काँग्रेस व भाजपचे नगरसेवक त्यांच्या अंगावर धावून गेले. महापौरांनी पळ काढल्याचा आरोप करत सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. व्यासपीठावरील राजदंडही पळविला.

महापालिकेची सभा महापौर सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. फेब्रुवारीत झालेल्या ऑनलाईन सभेच्या इतिवृत्त मंजुरीचा विषय विषयपत्रिकेवर होता. त्याला काँग्रेस व भाजपने विरोध केला होता. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. राष्ट्रवादीविरोधात भाजप व काँग्रेस एकत्र आल्याने सोमवारच्या सभेकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. नगरसेविका सविता मदने यांनी इतिवृत्तावर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत मतदानाची मागणी केली. काँग्रेसचे संतोष पाटील यांनी समर्थन केले. महापौर सूर्यवंशी यांनी त्यावर चर्चा करू, अशी भूमिका घेतली. त्याला काँग्रेस व भाजपने विरोध केला. मागील सभेचे सर्व विषय रद्द करून पुन्हा घ्यावेत, अथवा त्यावर मतदान घ्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. महापौरांनी ती मान्य केली नाही. त्यावरून गोंधळाला सुरुवात झाली.

काँग्रेसचे मंगेश चव्हाण, मयूर पाटील, फिरोज पठाण, तौफिक शिकलगार महापौरांच्या मदतीला धावले. हे पाहून भाजप व काँग्रेसचे सदस्य व्यासपीठासमोरील मोकळ्या जागेत जमा झाले. काहीजण महापौरांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे गदारोळ उडाला. सर्व सदस्यांना जागेवर बसण्याची विनंती महापौरांनी केली, पण कोणीही ऐकले नाही. अखेर राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी सर्व विषय मंजूर करण्याची सूचना केली. महापौरांनी सर्व विषय मंजूर झाल्याचे सांगत सभा संपल्याचे जाहीर करत सभागृह सोडले.

भाजपचे धीरज सूर्यवंशी यांच्यासह काही सदस्यांनी महापौरांनी घेराव घालत रोखून धरले. नगरसेविकांनीही महापौरांचा रस्ता अडविला. महापौरांच्या बचावासाठी मंगेश चव्हाण, मयूर पाटील धावले. त्यांनी महापौरांना शिताफीने सोडवत सभागृहाच्या दुसऱ्या प्रवेशद्वारातून बाहेर आणले. ‘पळाले रे पळाले, महापौर पळाले’, ‘पळपुट्या महापौरांचा निषेध असो’, अशा घोषणांनी विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले.

काँग्रेसमध्ये फूट

इतिवृत्त मंजुरीवरून काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झाले. सभेच्या विरोधात भाजप व काँग्रेसने सदस्यांच्या सह्या घेतल्या. भाजपच्या सर्व सदस्यांनी सह्या केला. पण काँग्रेसच्या वहिदा नायकवडी, मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, तौफिक शिकलगार व मयूर पाटील या पाच सदस्यांनी सही केली नाही. उलट ते महापौरांच्या समर्थनासाठी धावले.

Web Title: Sangli BJP Congress corporator ran towards the mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.