सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतील भाजपच्या सत्तेला अखेर सुरुंग लावण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला मंगळवारी यश आले. राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी यांनी भाजपचे धीरज सूर्यवंशी यांचा ३९ विरुद्ध ३६ मतांनी पराभव केला, तर उपमहापौरपदी काँग्रेसचे उमेश पाटील यांनी भाजपच्या गजानन मगदुम यांच्यावर मात केली.
भाजपची सात मते फुटल्याने अडीच वर्षांतच भाजपला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसला बरोबर घेत हे सत्तांतर घडवून आणले.
महापौरपदाची निवडणूक प्रथमच ऑनलाइन पार पडली. महापालिकेत एकूण सदस्यसंख्या ७८ असून, दोन सहयोगी सदस्यांसह भाजपचे संख्याबळ ४३ आहे, तर काँग्रेसचे १९ व राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक आहेत. काँग्रेसचे माजी महापौर हारुण शिकलगार यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त आहे. बहुमत असतानाही सात मते फुटल्याने भाजपला हार पत्करावी लागली.
पाच जणांचे मतदान, दोघे तटस्थ
राष्ट्रवादीने भाजपचे नऊ नगरसेवक फोडून अज्ञातस्थळी हलविले होते. त्यापैकी दोघे स्वगृही परतले, पण सात नगरसेवक मात्र शेवटपर्यंत ‘नाॅट रिचेबल’ होते. ही सातही मते फुटली. त्यातील महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, नसिमा नाईक, अपर्णा कदम, विजय घाडगे या पाच जणांनी उघडपणे राष्ट्रवादी व काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान केले, तर माजी उपमहापौर आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे तटस्थ राहिले. या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे.