सांगली : सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत मृत झालेल्या आणि पोलिसांनी आंबोलीत जाळण्याचा प्रयत्न केलेल्या अनिकेत कोथळेचा मृतदेह गुरुवारी सकाळी अकरा वाजता त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधून, मृतदेह ताब्यात घेण्याची विनंती केली आहे. नातेवाईकांनी त्याला सहमती दर्शविली आहे.दरम्यान, मिरज वैद्यकीय महाविद्यालयाकडील शरीररचनाशास्त्र विभागाने अनिकेतच्या मृत्यूचा अहवाल सीआयडीकडे सादर केला आहे. फॉरेन्सिक अहवाल गुरुवारपर्यंत सुपूर्द केला जाणार असल्याचे समजते.सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला लूटमारीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे व अमोल भंडारेला अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळला होता.
याप्रकरणी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला, झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले, कामटेचा मामेसासरा बाबासाहेब कांबळे या सातजणांना अटक करण्यात आली आहे. सध्या हे सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत.
सीआयडीने संशयितांच्या कॉल डिटेल्सवरून जबाब नोंदविले असून आतापर्यंत ५४ जणांचे जबाब घेतले आहेत. या घटनेत संशयितांनी तपास कामात सीआयडीला सहकार्य केलेले नाही, त्यामुळे सीआयडीने बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्या नार्को चाचणीसाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे.अनिकेतचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. सांगली पोलिसांनी आंबोलीतून हा मृतदेह ताब्यात घेऊन मिरज वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन केले होते. शवविच्छेदनातून मृत्यूचे कारण स्पष्ट होत नसल्याने मृतदेह शरीररचनाशास्त्र विभागाकडे सुपूर्द करण्यात आला होता.
गेल्या दोन महिन्यांपासून शरीररचनाशास्त्र विभागाने विविध चाचण्या घेऊन अनिकतेच्या मृत्यूचा अहवाल सीआयडीला सादर केला. अजूनही फॉरेन्सिक लॅबचा अहवाल प्राप्त झालेला नाही. तो गुरुवारपर्यंत सीआयडीकडे सादर होईल, असे सांगण्यात येत आहे.चाचण्या पूर्ण झाल्याने सांगली पोलिस व सीआयडीने अनिकेतच्या नातेवाईकाशी संपर्क साधून मृतदेह ताब्यात घेण्याची विनंती केली. ही विनंती नातेवाईकांनी मान्य केली आहे. गुरुवारी सकाळी अकरा वाजता सर्वपक्षीय कृती समितीसोबत अनिकेतचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेणार आहेत.
मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील मृतदेहाबरोबरच अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयातील त्याच्या अस्थीही ताब्यात दिल्या जाणार आहेत. त्यानंतर नातेवाईकांकडून अनिकेतच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
अनिकेतच्या मृतदेहाच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे हा मृतदेह ताब्यात घ्यावा, यासाठी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आहे. नातेवाईकांनी गुरुवारी मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी दर्शविली आहे.- शशिकांत बोराटे,अप्पर पोलिस अधीक्षक