लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील विविध भागांत घरफोडी करणाऱ्या चारजणांच्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. या टोळीकडून शहरातील विविध भागात करण्यात आलेल्या दहा घरफोडींचे गुन्हे उघडकीस आले असून, अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिली.
अटक केलेल्या संशयितांमध्ये अतिरेकी ऊर्फ आकाश श्रीकांत खांडेकर (वय २२, रा. राणाप्रताप चौक, सांगलीवाडी), अक्षय धनंजय पोतदार ( २०, रा. मालगाव रोड, सुभाषनगर), विजय संजय पोतदार (२३, रा. रामकृष्णनगर, कुपवाड) व रोहित गणेश माळी (२० रा. हरिपूर रोड, सांगली) यांचा समावेश आहे. अटक केलेले सर्वजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
जिल्ह्यातील घरफोडी, चोरीचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पथक गस्तीवर असताना, काळीवाट रोडवर शेतात असलेल्या एका पडक्या पोल्ट्रीजवळ रेकॉर्डवरील गुन्हेगार अतिरेकी ऊर्फ अक्षय खांडेकर व त्याच्या साथीदारांमध्ये पैशावरून वाद सुरू असल्याची माहिती पथकातील संतोष गळवे यांना मिळाली. पथक तिथे गेले असता, चौघेजण आढळून आले व त्यांच्याजवळील सॅकमध्ये सोन्या-चांदीचे दागिने, घडयाळे, रोख रकमेसह असा तीन लाख ६३ हजार १०३ रुपयांचा मु्द्देमाल मिळाला.
संशयितांनी गेल्या तीन महिन्यांत चोऱ्या केल्या आहेत. यात वखारभाग येथील पंजाबी स्पेअरपार्टच्या दुकानापाठीमागे असलेल्या अपार्टमेंटमधील फ्लॅट, रेल्वे ब्रिजजवळील आरवाडे पार्कमधील बंगला, शामरावनगर येथील घर, यशवंतनगर आंबा चौकाजवळील बंगला, विनायकनगर येथील घर, यशवंतनगर येथील पदमावती मंदिर, माधवनगर कत्तलखान्याजवळील घर, रमामातानगर येथील घर आणि आकाशवाणी केंद्राजवळील घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरल्याचे सांगितले.
दरम्यान, यापुढेही गुन्हेगारांवरील कारवाई अधिक कडक करणार असल्याचे अधीक्षक गेडाम यांनी सांगितले.
यावेळी अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहा. निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.