सांगली : सांगलीचे बसस्थानक जिल्ह्याचे एसटी मुख्यालय असल्यामुळे त्याचा बीओटी (बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा) तत्त्वावर विकास करून तेथील मोकळी जागा खासगी ठेकेदारांना देण्यात येणार आहे. सांगलीची कार्याशाळा (वर्कशॉप) माधवनगर जकात नाक्याजवळच्या पाच एकर जागेत स्थलांतरित करण्यात येणार आहे. एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा पर्याय शोधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हिरवा कंदील दाखविला आहे.राज्य परिवहन महामंडळांच्या सांगली बसस्थानक आणि आगाराचे अत्याधुनिक बांधकाम करतानाच उर्वरित जागांचा खासगी विकासकांमार्फत बीओटी तत्त्वावर विकास करण्याची योजना परिवहन विभागाने आखली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेला गती देण्याचे आदेश दिले असून यातून एसटीला कोट्यवधीची कमाई होईल असा अंदाज आहे.
सांगली बसस्थानक आणि आगाराची दहा एकर जागा आहे. या जागेत प्रशस्त बसस्थानक बांधून उर्वरित जागेत व्यावसायिक व्यापारी संकुल बांधण्यात येणार आहे. सांगली बसस्थानकातील सध्याची कार्यशाळा माधवनगर येथील पाच एकर जागेत विकसित करण्यात येणार आहे.चौकट
मिरजेसाठी ३० कोटींचा प्रस्तावमिरजेच्या मुख्य बसस्थानकासह शहरी बसस्थानकाचे आधुनिकीकरण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ३० कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे. यामध्ये बसस्थानकाच्या समोरील रस्त्याकडील भागात व्यावसायिक गाळे काढण्यात येणार आहेत.
उर्वरित जागेत बस्थानक, बैठक हॉल आणि चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृह बांधण्यात येणार आहे. कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्या सूचनेनुसार हा आराखडा करून शासनाकडे पाठविला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दहा वर्षांपूर्वीही झाला होता प्रयत्नदहा वर्षांपूर्वी राज्य सरकारने बीओटी तत्त्वावर सांगली बसस्थानकाचा विकास करण्याची योजना आणली होती, पण तिला विकासकांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे त्या धोरणात बदल करून नवी योजना राबवली जाणार आहे. लवकरच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांची नियुक्ती केली जाणार आहे.
मिरज बसस्थानकाचा ३० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून शासन निधी देणार आहे. सांगली बसस्थानक मात्र बीओटी तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहे. -सुशांत पाटील, विभागीय अभियंता, एसटी महामंडळ, सांगली.