- शरद जाधव
सांगली - शहरासह मिरज ग्रामीण, कर्नाटकातून दुचाकी, ट्रॅक्टर ट्रॉली लंपास करणाऱ्या पाचजणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. या संशयितांकडून पाच गुन्हे उघडकीस आले असून, सात दुचाकीसह ट्रॉली असा आठ लाख ९० हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
बसवराज बाळाप्पा नाईक(वय २४), ओकांर विष्णू नाईक (२१, दोघेही मूळ रा. आडवा रस्ता बोलवाड, सध्या शिवाजीनगर, पलूस), ओंकार महेश तांदळे (१९, रा. बेडग ता.मिरज), सिध्दार्थ पांडूरंग खोत (२१) आणि विश्वजीत गिरजाप्पा खोत (२० दोघेही रा. विठूरायाचीवाडी ता. कवठेमहांकाळ) अशी संशयितांची नावे आहेत.
जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणत कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक मिरज परिसरात गस्तीवर असताना, त्यांना माहिती मिळाली की संशयित नाईक याच्या बोलवाड येथील घरासमोर दुचाकी आहेत. त्यानुसार पथकाने जावून शोध घेतला त्यात नाईक याच्या घरासमोर दुचाकी आढळल्या. याबाबत त्याला समाधानकारक माहिती देता आली नाही. पोलिसांनी विश्वासात घेऊन माहिती घेतली त्यात शहरातील भारती रूग्णालय, अहिल्यानगर चौक आणि इतर परिसरातून दुचाकी लंपास केल्याचे सांगितले.
याच पथकास संशयित ओंकार तांदळे हा चोरी केलेली दुचाकी विक्रीसाठी म्हैसाळ पुलाजवळ थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई केली त्यात म्हैसाळ येथून दुचाकी चोरल्याची कबुली संशयित तांदळे याने दिली.
विठूरायाचीवाडी येथील विश्वजीत खोत व सिध्दार्थ खोत यांनी एक ट्रॅक्टर व ट्रॉली चोरून आणल्याची माहिती पथकाला मिळाली होती. पथकाने खोत याच्या वस्तीवर जावून पाहणी केली असता, संशयित पळून जाण्याच्या तयारीत हाेते. तेवढ्यात पथकाने दोघांना ताब्यात घेतले. यावेळी कुडची (कर्नाटक) येथून ट्रॅक्टर चोरल्याचे सांगितले. सर्व संशयितांकडून आठ लाख ९० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, कुमार पाटील, अमर नरळे, विक्रम खोत आदींच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली.
पाच गुन्हे उघडकीसविश्रामबाग पोलिस ठाणे, एमआयडीसी कुपवाड, संजयनगर, मिरज ग्रामीण आणि कुडची पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी व ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.