सांगली : स्वाईन फ्लू, डेंग्यू यासारख्या आजाराने लोकांचे आरोग्य बिघडले असून लोकांचे बळी जात असताना सत्ताधारी भाजप पदाधिकारी सत्कार कार्यक्रमात व्यस्त आहेत, अशी टीका सांगली जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक मंगेश चव्हाण, नगरसेवक फिरोज पठाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, महापालिकेतील सत्ताधारी भाजपची मंडळी केवळ मोठेपणा मिरविण्यात व्यस्त आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील लोक विविध आजाराने ग्रस्त झाले आहेत.
तिन्ही शहरात ४३५ डेंग्यूचे रुग्ण होते. त्यापैकी दोन दगावले आहेत. स्वाईन फ्लूचे ५३ रुग्ण असून त्यातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. येथील जनता मरणयातना भोगत असताना सत्ताधारी सत्तेचा पूर्ण उपभोग घेत आहेत. त्यांना लोकांच्या आरोग्यापेक्षा स्वत:चे सत्कार पसंतीचे झाले आहेत. त्यामुळे या विषयावर सभागृहात चर्चा करून उपाययोजना करण्यापेक्षा त्यांनी सभा गुंडाळून सत्कार समारंभाला हजेरी लावण्यास प्राधान्य दिले.लोकांप्रती त्यांना कोणतीही आस्था नाही. महापालिकेच्या इतिहासात कधीही यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी इतका निष्ठूरपणा दाखविला नाही. साथीचे आजार पसरले तर त्यासाठी उपाययोजना करण्यासाठी बैठका घेणे, संबंधित अधिकाऱ्याना सर्व्हे करण्याचे आदेश देणे, अशा गोष्टी यापूर्वी होत होत्या.
लोकांप्रती आस्थेची ही परंपरा मोडीत काढून नव्या सत्ताधाऱ्यांनी केवळ ही पदे मिरविण्यात धन्यता मानणे सुरू केले आहे. अनुभव नसल्याचे कारण काही पदाधिकारी पुढे करीत आहेत,पण एकही पदाधिकारी नवखा नाही. दोन ते चारवेळा निवडून आलेल्या लोकांना बहुतांश पदे मिळाली आहेत.
जुन्या प्रभागांना जोडण्यात आलेले नवे भाग आता महापालिकेच्या सर्व सोयींपासून वंचित आहेत. मुकादम, कामगारांची नियुक्तीच नव्या भागात केलेली नाही. त्यामुळे नगरसेवक, नागरिक तक्रार करूनही त्याची दखल सत्ताधाऱ्यांनी घेतली नाही. एकाही प्रभागातील मुकादम, कामगार किंवा अन्य यंत्रणेचे नियोजन नाही. केले असेल तर त्यांनी त्याबाबतची माहिती जनतेला द्यावी.कोणत्याही भागात नित्य औषध फवारणी, स्वच्छता, गटारींची स्वच्छता होत नाही. त्यामुळेच आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील अन्य भागांपेक्षा महापालिका क्षेत्रातील आजारांचे प्रमाण अधिक आहे. जनतेला हे लोक वाऱ्यावर सोडून बिनधास्तपणे विमानाने दौरे करीत आहेत, असे ते म्हणाले. यावेळी योगेश राणे, संग्राम चव्हाण, सुफियाना पठाण, गणेश जाधव, विशाल पोळ फारुक जामदार उपस्थित होते....अन्यथा महापालिकेसमोर आंदोलनसत्ताधारी गटाला आम्ही दोन दिवसांची मुदत देत आहोत. या कालावधित त्यांनी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत, तर महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल. टप्प्याटप्प्याने त्याची तीव्रता वाढवू, असा इशारा चव्हाण व पठाण यांनी यावेळी दिला.