Sangli: देशातील सहकार क्षेत्र कमकुवत करण्याचे केंद्र शासनाचे षडयंत्र, एच. के. पाटील यांची घणाघाती टीका
By शीतल पाटील | Published: February 20, 2023 04:07 PM2023-02-20T16:07:37+5:302023-02-20T16:10:00+5:30
Sangli News: सहकार चळवळीमुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांचा विकास झाला. महाराष्ट्र तर सहकाराची काशी म्हणून ओळखली जाते. पण आता हे सहकार क्षेत्र कमकुवत करण्याचे षडयंत्र केंद्र शासनाने सुरू केले आहे.
- शीतल पाटील
सांगली : सहकार चळवळीमुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांचा विकास झाला. महाराष्ट्र तर सहकाराची काशी म्हणून ओळखली जाते. पण आता हे सहकार क्षेत्र कमकुवत करण्याचे षडयंत्र केंद्र शासनाने सुरू केले आहे. सहकार क्षेत्राकडील दीड लाख कोटी रुपये शासनाकडे वळविण्यात आले आहेत. याविरोधात आवाज उठविण्याची गरज असल्याचे काँग्रेसचे प्रभारी आमदार एच. के. पाटील यांनी सांगितले.
सांगलीत सहकारतीर्थ गुलाबराव पाटील जन्मशताब्दी सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. पाटील म्हणाले, रिझर्व्ह बँकेच्या फतव्यानुसार सहकार खात्याने एक लाख पन्नास हजार कोटी रुपये शासनाकडे वळते केले आहेत. हे सहकार कमकुवत करण्याचे षडयंत्र आहे. याविरोधात आवाज उठवायला हवा. ज्या राज्यांत सहकार नाही, त्या राज्यांची प्रगती झालेली नाही, हे सत्य आहे. प्रत्येक राज्यकर्त्यांनी, धोरणाकर्त्यांनी हे लक्षात ठेवायला हवे. सांगलीतील नेत्यांनी सहकार क्षेत्राला खूप मोठे योगदान दिले. शरद पवार यांनी सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी पायाभूत भूमिका घेतली. पण सध्याचे केंद्रातील सरकार खासगीकरणाला चालना देत असल्याची टीका पाटील यांनी केली.
अमित शाहांवर टीका
आता सहकार चुकीच्या दिशेने चालला आहे. त्याला बदनाम केले जात आहे. ज्यांना सहकाराचा काहीच गंध नाही, असे लोक महाराष्ट्रात येऊन सहकारावर बाष्कळ बोलू लागले आहेत. सहकार मोडण्याचा त्यांचा उद्देश असल्याची टीका एच. के. पाटील यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांचे नाव न घेता केली.