सांगली : छत्रपती राजश्री शाहू शिष्यवृत्ती योजनेस पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ज्या संस्थांनी प्रवेश घेतेवेळी 100 टक्के शिक्षण शुल्क भरून घेतले आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांची 50 टक्के शिक्षण शुल्काची रक्कम 15 सप्टेंबरपर्यंत परत करा, असे आदेश जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी दिले.
यावेळी त्यांनी ज्या संस्था छत्रपती राजश्री शाहू शिष्यवृत्ती योजनेची वेळेत अंमलबजावणी करणार नाहीत अशा संस्थांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात येतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.छत्रपती राजश्री शाहू शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी सांगली जिल्ह्यातील उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, कृषि, पशुवैद्यकीय, औषध निर्माण संबंधी शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांचे प्रमुख उपस्थित होते.या योजनेस पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती व प्रत्यक्षात लाभार्थ्यांची माहिती संस्था प्रमुखांकडून संकलित करण्यात आली. ज्या संस्था चालकांनी विद्यार्थ्यांना डोमीसाईल प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला या कारणाने 100 टक्के शुल्काची रक्कम भरून घेतली आहे, अशा विद्यार्थ्यांची नावे त्यांचा पत्ता व फोन क्रमांकासह तपशिलासह तात्काळ सादर करण्याचेही आदेश जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी यावेळी दिले.
डोमीसाईल प्रमाणपत्रे व उत्पन्नाचे दाखल्यांसाठी जे विद्यार्थी अर्ज सादर करतील त्यांना त्याच दिवशी हे दाखले देण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.