ठळक मुद्देमुलाच्या वाढदिवसाला आलेला जवान अपघातात ठारबिऊरजवळ मोटारसायकल-मोटारीची धडक
शिराळा : बिऊर (ता. शिराळा) येथील मोरणा नदी पुलाजवळ मोटारसायकल व मोटारीच्या धडकेत सीमा सुरक्षा दलातील जवान अमित पांडुरंग पाटील (वय २७, रा. रिळे, ता. शिराळा) ठार झाले, तर सुनील ऊर्फ संदीप महादेव पाटील (२६, रा. रिळे ) गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी पावणेनऊच्या दरम्यान घडली. जवान अमोल पाटील गावची यात्रा आणि मुलाच्या पहिल्या वाढदिवसासाठी सुटीवर आले होते.
सर्जेराव नाना पाटील यांनी शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिन्याच्या सुटीवर आलेले जवान अमित पाटील व सुनील पाटील सोमवारी सकाळी शिराळा येथे आले होते. काम आटोपून मोटारसायकलवरून (क्र. एमएच १० सीई ३०३८) रिळे येथील घराकडे निघाले होते, तर वसंत जयसिंग पाटील (रा. बिऊर, ता. शिराळा) बिऊरहून शिराळ्याकडे मोटारीने (क्र. एमएच १० क्यू ०००८) निघाले होते.
मोरणा नदी पुलाजवळ दोन्ही वाहनांची धडक झाली. यामध्ये अमित पाटील व सुनील पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी इस्लामपूर येथे नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच जवान अमित पाटील यांचा मृत्यू झाला, तर सुनील पाटील यांच्या पायाचे हाड मोडले आहे, तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची शिराळा पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, मोटारचालक वसंत पाटील याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अमित पाटील सध्या अरुणाचल येथे सीमा सुरक्षा रक्षक दलात कार्यरत होते. त्यांच्या वडिलांचे वीस वर्षांपूर्वी निधन झाले असून, अमित चार वर्षांपूर्वी मीमा सुरक्षा दलात दाखल झाले होते. दोन वर्र्षांपूर्वी जोंधळेवाडी (ता. शाहूवाडी) येथील सोनाली यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना एक वर्षाचा आरंजय हा मुलगा आहे. घरी आई सावित्रीबाई, एक अविवाहित बहीणही असून, त्यांची एक बहीण विवाहित आहे. कुटुंबाची सर्व जबाबदारी अमित यांच्यावर होती. त्यांच्या अपघाती निधनामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.वाढदिवस पाहता आलाच नाही!रिळे गावची यात्रा शुक्रवार व शनिवारी झाली. शिवाय अमित यांचा मुलगा आरंजयचा पहिला वाढदिवस दि. २२ फेब्रुवारीरोजी होता. यात्रेसाठी आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी ते एक महिन्याची सुट्टी घेऊन घरी आले होते; मात्र मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सुखाचे दिवस अनुभवण्याआधीच...अमित अकरा वर्षांचे असतानाच त्यांच्या वहिलांचे निधन झाले होते. त्यामुळे आईने अमित यांच्यासह स्वप्नाली तसेच सुप्रिया या दोन बहिणींचा मोठ्या कष्टाने सांभाळ केला. हलाखीत दिवस काढल्यानंतर अमित यांना सीमा सुरक्षा दलात नोकरी मिळाली. आता कुठे सुखाचे दिवस यायला लागले असतानाच, अमित यांचे अपघाती निधन झाले.