सांगली : येथील गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपात करुन भ्रूणांची हत्या केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या डॉक्टर चौगुले दाम्पत्यासह सहाजणांविरुद्ध जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. म्हैसाळ (ता. मिरज) येथील गर्भपात व भ्रूण हत्यानंतर सांगलीतही सहा महिन्यांपूर्वी गर्भपाताचे हे प्रकरण उघडकीस आले होते.
दोषारोपपत्र दाखल झालेल्यांमध्ये डॉ. विजयकुमार शामराव चौगुले (वय ४३), डॉ. रूपाली विजयकुमार चौगुले (३९, रा. सिद्धिविनायक नक्षत्र अपार्टमेंट, फेडरल बँकेसमोर, विश्रामबाग, सांगली) त्याचा मेहुणा डॉ. स्वप्नील जगवीर जमदाडे, अविजित पोपटराव महाडिक (३०, रा. शाहूनगर, विटा, ता. खानापूर), उत्तर तांबवे (ता. कºहाड) येथील सुजीत दिलीप कुंभार (वय २९, रा. उत्तर तांबवे, ता. कºहाड) व नांदणी शिरोळ तालुक्यातील एजंटाचा समावेश आहे. यातील संशयित जमदाडे हा अजूनही फरारी आहे. सुजीत कुंभार याचा कारागृहात मृत्यू झाला आहे. नांदणीचा एजंट शासनाच्या १०८ रुग्णवाहिकेवर चालक होता. तो गर्भपातासाठी महिलांना पुरविण्याचे काम करीत होता. सध्या चौगुले दाम्पत्यासह तीन डॉक्टर अटकेत आहेत. चौगुले दाम्पत्यास शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या हॉस्पिटलचा परवानाही निलंबित करण्यात आला आहे.
महापालिकेच्या आरोग्य पथकाने १५ सप्टेंबर २०१८ रोजी गणेशनगरमधील पाचव्या गल्लीत असलेल्या चौगुले हॉस्पिटलवर छापा टाकला होता. त्यावेळी बेकायदा गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आले होते. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांचा गर्भपात केल्याचे पुरावे तपासात मिळाले होते. गर्भपाताबरोबर महिलांच्या बेकायदा कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाही करण्यात आल्या होत्या. एकूण अकरा महिलांचा गर्भपात केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.
सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील अनेक डॉक्टर चौकशीच्या ‘रडार’वर आले. त्यांची चौकशीही झाली; पण ठोस कोणतेही पुरावे न मिळाल्याने त्यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई करता आली नव्हती. संशयित सुजीत कुंभार हा चौगुले हॉस्पिटलला गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांचा पुरवठा करीत होता. त्यास सांगलीतील कारागृहात ठेवण्यात आले होते. रक्ताची उलटी झाल्याने तीन महिन्यांपूर्वी त्याचा मृत्यू झाला होता.गर्भपात प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हाचौगुले दाम्पत्यासह या प्रकरणातील सर्व संशयितांविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात वैद्यकीय गर्भपात प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बेकायदा गर्भपात करणे, महापालिकेचा परवाना न घेणे, परवाना नसताना महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आदी दोषारोप संशयितांविरुद्ध ठेवण्यात आले आहेत. सध्या चौगुले हॉस्पिटल बंद आहे. महापालिकेने त्यास सील ठोकले आहे.