सांगली : विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट व वादळी वाऱ्यासह आलेल्या वळीव पावसाने आज, शनिवारी दुपारी सांगली शहराला झोडपून काढले. वळीवाच्या या पावसाने ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या, विद्युत तारा तुटल्या. शहराच्या अनेक भागात पाणी साचून राहिले होते.सांगली शहर व परिसरात शनिवारी सकाळपासून उन्हाची तीव्रता जाणवत होती. दुपारी अचानक ढगांची दाटी झाली. विजांच्या कडकडाटासह दुपारी ३ वाजता वादळी पावसाने हजेरी लावली. अर्धा तास पावसाने झोडपून काढले. सांगलीत काळी खण, मार्केट यार्ड परिसर, सांगली-मिरज रोड अशा सात ते आठ ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीची काेंडी झाली होती. झाडाच्या फांद्या विद्युत तारांवर पडून ताराही तुटल्या.अर्ध्या तासात पावसाने शहराला जलमय केले. मार्केट यार्ड, उत्तर शिवाजीनगर, छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या पूर्व बाजूकडील रस्त्यावर, शिवाजी मंडई, बसस्थानक परिसर, मारुती रोड, राजवाडा चौक, स्टेशन रोड याठिकाणी पाणी साचून राहिले होते. झाडांच्या पाला-पाचोळ्याने शहरातील रस्ते व्यापले होते.वाऱ्याने केल्या फलकाच्या चिंध्यावादळी वाऱ्याने शहरातील बहुतांश डिजिटल फलक हटले. मोठमोठ्या फलकांच्या वाऱ्यामुळे चिंध्या झाल्या. काही ठिकाणी फलकांचे अँगलही मोडकळीस आले.
शहराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले; ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या, विद्युत तारा तुटल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 7:36 PM