सांगली : तलवार, कुकरी, कोयते अशी धारदार शस्त्रे घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी टोळी सांगली शहर पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने जेरबंद केली. बायपास रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.पोलिसांनी संशयित मोहन दिपक वाघमारे (वय ३१, रा. शाळा नं. ४४ जवळ, संजयनगर), आदित्य चंद्रकांत भिसे (वय २०), टिपू हसन जमादार (वय २०), आशपाक हसन जमादार (वय १८, रा. वसंतदादा कुस्ती केंद्राजवळ), नामदेव पंडीत तपले (वय ३२, रा. सरकारी तालिमजवळ, गवळी गल्ली), गणेश अनिल बिरूनगी (वय २८, रा. रामकृष्णनगर, कुपवाड) यांना अटक केली. तसेच चार अल्पवयीन युवकांना ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे संतोष गळवे यांना एका बातमीदारामार्फत बायपास रसत्यावर एक टाेळके व्यापाऱ्यास लुटण्याच्या उद्देशाने तलवार, कोयते, चाकू अशी हत्यारे घेऊन थांबल्याची माहिती दुपारी तीन वाजता मिळाली. त्यामुळे पोलिस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा आबा हॉटेलपासून पश्चिम बाजूला एका ठिकाणी काही संशयित दुचाकी घेऊन थांबल्याचे दिसले. पोलिसांची चाहूल लागताच ते पळून जावू लागले. परंतू त्यांना घेराव घालून पकडले. त्यांच्याकडे कुकरी, तीन काेयते, दोन तलवारी, चाकू, मिरची पावडर, नायलॉन दोरी, तीन दुचाकी, मोपेड, मोबाईल असा ३ लाख २३ हजार ५५० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.पोलिस निरीक्षक संजय मोरे, उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण, महादेव पोवार, कर्मचारी सचिन शिंदे, संदीप पाटील, मच्छिंद्र बर्डे, रफीक मुलाणी, विनायक शिंदे, गणेश कांबळे, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार, योगेश सटाले, सुमित सूर्यवंशी, पृथ्वीराज कोळी यांच्या पथकाने कारवाई केली. पोलिस हवालदार संदीप पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
संभाव्य गुन्हा टळलासंशयित दहाजणांना शहर पोलिसांच्या पथकाने वेळीच ताब्यात घेतल्यामुळे बायपास रस्त्यावरील संभाव्य गुन्हा टळला. या कारवाईबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.