प्रताप महाडिककडेगाव : सांगली जिल्ह्यातील ८०० मनोरुग्णांवर रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातून औषधोपचार केला जातो. बहुतांशी रुग्णांचे नातेवाईक महिन्याला रत्नागिरीला जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेऊन येतात, तर काही मनोरुग्णांना प्रत्यक्ष रत्नागिरीला उपचारासाठी घेऊन जावे लागते. सध्या जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत. यामुळे मनोरुग्ण औषधापासून वंचित आहेत. त्यांच्यासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात सुविधा उपलब्ध केली आहे.
मनोरुग्णांवर तातडीने योग्य औषधोपचार आवश्यक असतात. मात्र जिल्ह्याच्या सीमा बंद झाल्यामुळे प्रादेशिक मनोरुग्णालयाची वाट बंद झाली आहे. आॅनलाईन परवानगी घेऊन रत्नागिरीला जाण्याबाबत कित्येक मनोरुग्णांचे नातेवाईक अनभिज्ञ आहेत. रत्नागिरीच्या मनोरुग्णालयात नियमित आणि मोफत उपचार घेणाºया रुग्णांना खासगी मनोरुग्णालयात उपचारासाठी जाणे व औषधोपचाराचा खर्च परवडत नाही.. यातच तज्ज्ञ डॉक्टरांनी औषधे लिहून दिल्याशिवाय औषधे घेणे योग्य नसते. संबंधित रुग्णांना आवश्यक औषधे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने सांगली सिव्हिल रुग्णालयात मिळतात.
लॉकडाऊन सुरू होऊन महिना झाला आहे. बहुतांशी मनोरुग्णांची औषधे संपली आहेत. पुन्हा औषधे घेण्याची गरज असताना लॉकडाऊनमुळे औषधांपासून वंचित राहत आहेत. रत्नागिरीला जायचे कसे, या विवंचनेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना सांगलीचे शासकीय रुग्णालय आशेचा किरण ठरत आहे. आवश्यक व तातडीने लागणारी औषधे संपल्याने हाल होत असलेल्या रुग्णांचे नातेवाईक सांगलीत जाऊन औषधे घेऊ शकतील.
रत्नागिरीची फाईल घेऊन भेटाजिल्ह्यातील मनोरुग्णांना योग्य औषधोपचार मिळावेत, यासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दररोज सकाळी ९ ते १ या वेळेत रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकाने संबंधित रुग्णाने उपचार घेतलेल्या रुग्णालयाची फाईल घेऊन भेटावे. येथे मनोरुग्णांना योग्य ते औषधोपचार मिळतील, अशी माहिती सांगली शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. गजानन साकेकर यांनी दिली.