सांगली : तासगावच्या मारामारीस मुख्यमंत्र्यांचा आशिर्वाद आहे का? : सुनील तटकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 01:34 PM2018-04-05T13:34:38+5:302018-04-05T13:34:38+5:30
तासगावमध्ये भाजपच्या काही गुंडांनी केलेल्या मारामारीच्या घटनेस मुख्यमंत्र्यांचा आशिर्वाद होता का, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
सांगली : तासगावमध्ये भाजपच्या काही गुंडांनी केलेल्या मारामारीच्या घटनेस मुख्यमंत्र्यांचा आशिर्वाद होता का, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
ते म्हणाले की, शासनपुरस्कृत गुंडगिरीचे दर्शन आता राज्यभर घडू लागले आहे. तासगावमधील प्रकार कसा घडला, त्यावर मुख्यमंत्र्यांनी काहीच कारवाई का केली नाही, त्यांचा या प्रकाराला आशिर्वाद होता का, असे सर्व प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
जत येथील सभेतही आम्हाला खासदार, आमदारांच्या गुंडगिरीबद्दल जनतेमधून रोष दिसून आला. जनता या सर्व गोष्टी बघत आहे. त्यामुळे योग्यवेळी भाजपला त्यांची जागा जनताच दाखवून देईल. सरकारचा हस्तक्षेप सर्वच क्षेत्रात सुरू झाला आहे.
राज्य निवडणूक आयोगाचेही नियम त्यांनी हवे तसे बदलले. कर्नाटकमधील निवडणुकीचा कार्यक्रम त्यांच्या कार्यकर्त्यांना अगोदर कळाला होता. त्यामुळे ईव्हीएम मशिनच्या माध्यमातूनही ते निवडणुका जिंकू पहात आहेत. त्यामुळे भाजप सरकारच्या काळात बॅलेट पेपरचा वापर करण्याची मागणी आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे करणार आहोत.
सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांमागे चौकशा लावल्या जातात, ही गोष्ट आता नवी राहिली नाही. आमच्या पक्षाच्या मागे सिंचन घोटाळ््याची चौकशी लावली आहे. बऱ्याच गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत. आम्ही प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्यास तयार आहोत. शिवसेनेलाही ते अशाच पद्धतीने धमकावत आहेत.
नालायकांमध्ये शिवसेनेचे १२ मंत्री
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मेस्मा कायदा लागू केल्यानंतर विरोधकांनी त्यावर टीका केली. शिवसेनेने विरोधाची औपचारिकता दर्शविली. मुख्यमंत्र्यांनी शिवसेना मंत्र्यांकडे डोळे वठारून पाहिल्यानंतर ते मंत्री मौन बाळगून खाली बसले.
शिवसेनेचे हे दुटप्पी धोरण आता सर्वांनाच कळाले आहे. शिवसेना सरकारला नेहमीच नालायक म्हणते, पण याच नालायकांमध्ये यांचे १२ मंत्री आहेत, याचे भान त्यांना दिसत नाही.
जातीय दंगलीची चिन्हे!
विविध जाती-धर्मांच्या लोकांमध्ये विष पसरविण्याचे काम सध्या सुरू आहे. निवडणुका अशा जातीय दंगलींच्या बळावर लढविल्या जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे लोकांनीच याविषयी सतर्कता बाळगावी, असे मत सुनील तटकरे यांनी यावेळी केले.