सांगली : अंध असणाऱ्या... पण मनाने कलाकार असणाऱ्या गायकांनी थक्क करणारी सुरेल गाणी सादर करुन सांगलीकरांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले. तर शासकीय अपंग बालमंदिर आणि प्रभात मंदिरच्या मतीमंद मुलांनी सादर केलेल्या नृत्यांनी रसिकांना ताल धरायला लावला. मन आणि शरीर अपंग असतानाही या मुलांनी गाण्याच्या नृत्यातून दाखवलेली अदाकारी थक्क करणारी होती.निमित्त होते सांगली महापालिकेच्या जागतिक दिव्यांग दिनाचे...मंगेशकर नाट्यगृह तुडूंब भरलेले... आपलेच दिव्यांग, अंध, मतीमंद सहकारी कला सादर करताना...त्याला दाद देताना होणारा आनंद गगनात मावेना अशी अवस्था त्यांच्या पालकांची झाली होती.
परिस्थितीने आपल्या पाल्याला आलेले अपंगत्व त्या कलेमुळे पालकही आनंदीत झाले होते. महापौर संगीता खोत, उपायुक्त स्मृती पाटील, नगरसेविका स्वाती शिंदे, भारती दिगडे आदींच्या संकल्पनेतून दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला होता.स्वरगंधार या संस्थेने अंध गायक कलाकारांचा थक्क करणारा कार्यक्रम सादर केला. मार्गदर्शक रामदास कोळी, मनिषा नवाळे, सुजाता वाघमारे यांनी संयोजन केले होते. महेश नवाळे, मनिषा नवाळे यांच्या संयोजनातून साकारलेला अंधाचा कार्यक्रम शेवटपर्यत रंगला.
विक्रम पवार, मकरंद पारवे, सुनिता सुनवणे, रविंद्र सुनवणे या अंध गायकांनी सत्यम शिवम सुंदरम््, रुपेरी वाळूत ,जिवा शिवाची बैलजोड, देवाक काळजी , पापा कहते है, सोला बरस की, चढता सुरु, या रावजी, अशी अनेक हिंदी, मराठी गाणी सादर केली.
डोळे नसताना शब्दांचा गोडवा ओठातून आवाजातून झिरपत होता. संगीत साथ महेश नवाळे (तबला), प्रविण पाखरे (ड्रम, आॅक्टोपॅड), सालम नदाम, सचिन कांबळे (कि बोर्ड), सतिश वाघमारे (ढोलकी)यांनी केली.