- शरद जाधवसांगली - वन विभागाच्या वनरक्षक परीक्षेत कॉपीचा प्रयत्न करणारा तरुण गेल्याच आठवड्यात अटक केला असताना सांगलीत पुन्हा एकदा या परीक्षेत घोळ झाला आहे. त्यानुसार आता एका डमी उमेदवारास रंगेहात पकडले. प्रदीप कल्याणसिंग बैनाडे (रा.बेंद्रेवाडी जि. औरंगाबाद) असे पकडलेल्या डमी उमेदवाराचे नाव आहे. संशयित बैनाडे हा राहुल सुखलाल राठोड (वय २८ रा. हरसील जि. औरंगाबाद) याच्या जागी डमी परीक्षा देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मिरज रोड वरील वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट कॉलेजमध्ये हा प्रकार उघडकीस आला. गेल्या आठवड्यापासून सांगलीत वन विभागाच्या भरती परीक्षा सुरू आहेत. सध्या वन रक्षक पदासाठी परीक्षा होत आहेत. संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होत असतानाही यात गैरप्रकार समोर येत आहेत.
वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी अँड रिसर्च या कॉलेजमध्ये वनविभागाच्या वन रक्षक पदासाठीच्या भरतीचा पेपर मंगळवारी दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास पेपर सुरु झाल्यानंतर संशयित हा वनविभागाच्या परीक्षेचा फॉर्म भरलेला मूळ उमेदवाराच्या जागी डमी उमेदवार म्हणून परीक्षा देण्यासाठी केंद्रात आला होता. परीक्षा सुरु झाल्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे हे उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करत असताना कागदपत्रांबाबत संशय आला. सखोल चौकशी केली असता डमी उमेदवार म्हणून परीक्षेसाठी बसल्याची बाब लक्षात आली. यानंतर तातडीने त्याच्यावर कारवाई करण्यात आली. संशयितांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.