सांगली : जिल्ह्यात पुन्हा एकदा महामंडळांच्या नियुक्तीचे वारे वाहू लागले असून इच्छुकांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. भाजपच्या जुन्या-नव्या अशा दोन्ही गटातील इच्छुकांसाठी आमदार, खासदार आणि अन्य बड्या पदाधिकाऱ्यांकडूनही ताकद पणाला लावली जात आहे. एखादेच महामंडळ जिल्ह्याच्या पदरात पडणार असल्याने त्यासाठीची जोरदार रस्सीखेच दिसून येते.सांगली जिल्ह्यातील भाजप नेत्यांना राज्यातील महत्त्वाच्या पदांपासून डावलले गेले आहे. एकाही नेत्याला मंत्रीपदही प्राप्त झाले नाही. भाजपमध्ये सध्या नेत्यांची मोठी गर्दी दिसत आहे. ताकदीचे लोक मिळूनही त्यांच्याकडे कोणत्याही जबाबदाऱ्या अद्याप नाहीत.
पक्षीय पदांच्या माध्यमातून दुधाची तहान ताकावर भागविण्यात आली असली तरी घुसमट संपलेली नाही. यातूनच पुन्हा जुन्या-नव्या वादाचे ग्रहण पक्षाला लागले आहे. पक्षातील अंतर्गत संघर्ष संपविण्यासाठी राज्यस्तरीय पदांवरील नेमणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. त्यामुळेच महामंडळांसाठी सध्या पक्षात जोरदार फिल्डिंग लागली आहे.महामंडळांच्या शर्यतीत माजी आमदार दिनकर पाटील, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, शेखर इनामदार, गोपीचंद पडळकर, अरविंद तांबवेकर, मकरंद देशपांडे यांची नावे चर्चेत आहेत. ज्यांच्याकडे पक्षाचे प्रदेशचे पद असेल त्यांच्या गळ््यात महामंडळाची माळ पडणे अडचणीचे झाले आहे.
पक्षातील काही नेत्यांनी याबाबतची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. राजकीय वजन वापरून दुसरे पद पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न झाला, तर पक्षांतर्गत संघर्ष आणखी तीव्र होऊ शकतो. त्यामुळे अशा गोष्टी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर टाळण्याकडे पक्षाचा कल आहे.
बहुतांश इच्छुक हे आ. सुधीर गाडगीळ यांच्या जवळ असतात. त्यामुळे एकाचवेळी अनेक इच्छुकांसाठी शिफारस करण्याची वेळ गाडगीळांवर आली आहे. त्यांचा स्वभावही सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा असल्याने त्यांनी कोणाला न दुखावता इच्छुकांची नावे पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे.
खासदार संजयकाका पाटील यांनीही अरविंद तांबवेकर यांच्यासाठी प्रदेश कार्यकारिणीकडे ताकद पणाला लावली आहे. महामंडळावर आपल्या निकटवर्तीयाची वर्णी लागावी म्हणून त्यांनी हे प्रयत्न सुरू केले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत तांबवेकर यांनी दाखविलेली ताकद व आगामी महापालिका निवडणुकीचा दाखलाही संजयकाकांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी तांबवेकरांनी संजयकाकांसाठी मेहनत घेतली होती. त्यामुळेच संजयकाकांनीही आता त्यांच्या पदरात मोठे पद टाकण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.महापालिका निवडणुकीचा विचार केला तर संजयकाकांबरोबरच माजी आमदार दिनकर पाटील, शेखर इनामदार, नीता केळकर आणि मकरंद देशपांडे हे चार शिलेदारही महत्त्वाचे मानले जातात. म्हणजेच इच्छुकांमध्ये सर्वाधिक इच्छुक हे महापालिका क्षेत्राशी संबंधित आहेत.
नीता केळकर यांच्याकडे प्रदेशचे उपाध्यक्षपद तसेच स्थानिक समित्यांमधील पदेही आहेत. मकरंद देशपांडे यांच्याकडे सध्या विभागीय संघटकपद आहे. मोठे पद नसलेल्या इच्छुकांमध्ये दिनकर पाटील, शेखर इनामदार आणि अरविंद तांबवेकर यांचा समावेश आहे.गोपीचंद पडळकरांची ताकदही भाजपला दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यामुळे त्यांच्या नावाचा विचारही या शर्यतीत केला जात आहे, मात्र विधानसभा उमेदवारीच्या शर्यतीतसुद्धा ते आहेत. त्यामुळे पक्ष त्यांना कोणत्या माध्यमातून ताकद देणार आहे, याची कल्पना स्थानिक नेत्यांनाही नाही. तरीही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्यांना ताकद देण्याची तयारी सुरू आहे.नेत्यांची प्रतिष्ठा डावावरमहामंडळांच्या शर्यतीत उतरलेल्या इच्छुकांपेक्षा त्यांच्यासाठी धडपडणाऱ्या नेत्यांचीच प्रतिष्ठा डावावर लागली आहे. कोणत्या नेत्याची ताकद पदांच्या शर्यतीत कामी येणार, हासुद्धा चर्चेचा विषय आहे. मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याला स्थान मिळेल, अशीही शक्यता वर्तविली जात असताना, महामंडळाच्या चर्चेलाही उधाण आले आहे. एकाचवेळी जिल्ह्याला दोन्ही मोठी पदे मिळण्याचीही चिन्हे दिसत आहेत.