सांगली/म्हैसाळ : अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला मुहूर्त मिळाला, मात्र आवर्तनाच्या प्रारंभालाच उद्घाटनाच्या उपस्थितीवरून भाजप व कॉंग्रेस नेत्यांमध्ये जुंपली. कॉंग्रेस नेते अनिल आमटवणे व भाजपचे तालुका अध्यक्ष दिनकर भोसले यांच्यात जोरदार वादावादी व शिवीगाळचा प्रकार घडला.म्हैसाळ योजनेवरून गेले काही महिने कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य पक्षीयांचे आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे सत्ताधारी भाजपच्या नेत्यांना या गोष्टीची दखल घेत योजना सुरू करावी लागली. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर योजनेचा खंडित झालेला वीजपुरवठा सुरू झाला.
योजनेच्या वीजपुरवठ्याच्या बटणाची कळ दाबून योजना सुरू करण्यासाठी कॉंग्रेस, भाजपचे नेते, कार्यकर्ते शनिवारी म्हैसाळ येथील पंपगृहाजवळ जमले होते. कळ दाबण्यावेळीच राजकीय कळ दाबली गेल्याने दोन्ही पक्षांचे नेते व समर्थक आमने-सामने झाले. एकमेकांच्या अंगावर धावून जाताना शिवीगाळही करण्यात आली.
दोन्ही नेते व त्यांचे समर्थक आक्रमक झाले. एकमेकांना शिवीगाळ करण्यापर्यंत भांडण वाढले. शेवटी खासदार पाटील यांना या भांडणात मध्यस्थी करावी लागली. त्यांनी हे भांडण अखेर सोडविले आणि योजनेची कळ दाबून आवर्तनास सुरुवात केली. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, जी. व्ही. खाडे, एस. एम. नलावडे, जी. टी. वाकुर्डे, एम. आर. जाधव, एस. व्ही. पुजारी, एन. एच. चौगुले, चंद्रकांत कोळी उपस्थित होते.