सांगलीत कॉंग्रेसतर्फे उपोषण, भाजपने गरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत :विश्वजीत कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 06:48 PM2021-03-26T18:48:59+5:302021-03-26T18:51:47+5:30
Vishwajeet Kadam Congress Sangli -केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोधासाठी कॉंग्रेस पक्षातर्फे काँग्रेस भवन समोर शुक्रवारी उपोषण आंदोलन झाले. त्यामध्ये कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, पृथ्वीराज पाटील, मोहनराव कदम, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील आदी सहभागी झाले.
सांगली : केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे असल्यामुळे त्वरीत रद्द करावेत अशी मागणी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केली. कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात शुक्रवारी काँग्रेस पक्षातर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी संघटनांच्या भारत बंदला पक्षाने उपोषणाच्या माध्यमातून पाठिंबा दिला.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोधासाठी कॉंग्रेस पक्षातर्फे काँग्रेस भवन समोर शुक्रवारी उपोषण आंदोलन झाले. त्यामध्ये कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, पृथ्वीराज पाटील, मोहनराव कदम, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील आदी सहभागी झाले.कॉंग्रेस भवनसमोर आंदोलनाचे नेतृत्व डॉ. कदम यांच्यासह आमदार मोहनराव कदम, काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, शैलजा पाटील, विशाल पाटील, पक्षाचे निरीक्षक सचिन नाईक, जितेश कदम आदींनी केले.
डॉ. कदम म्हणाले, कृषी कायद्यांवर कोणतीही चर्चा न करता भाजप सरकारने जबरदस्तीने मंजूर केले. कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर लाखो शेतकरी चार महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. सरकारने त्यांच्याशी चर्चेचे नाटक केले, पण कायदे मागे घेतले नाहीत. तीनशेहून अधिक शेतकरी शहीद झाले, त्याचीही दखल घेतली नाही. शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे.
आंदोलनात पै. नामदेवराव मोहिते, उपमहापौर उमेश पाटील, मंगेश चव्हाण, बाळासाहेब गुरव, आप्पासाहेब पाटील, आशा पाटील, वहिदा नाईकवडी, दिलीप पाटील, अजित भोसले, अजित ढोले, अजित शिरगावकर, सुभाष खोत, सदानंद जवळगे, सुवर्णा पाटील, मालन मोहिते, वैशाली वाघचौरे, बिपीन कदम, अण्णासाहेब कोरे, संजय मेंढे, वसीम रोहिले, प्रताप चव्हाण, शुभांगी साळुंखे, फिरोज पठाण, आरती वळवडे, मनोज सरगर, अमर निंबाळकर, संतोष पाटील, प्रशांत पाटील, ताजुद्दीन तांबोळी, सनी धोत्रे, अयुब निशाणदार आदी सहभागी झाले.
भाजप नेत्यांची कटकारस्थाने
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात अधिकाऱ्यांना हाताशी धरून भाजपचे नेते कटकारस्थान करत आहेत. फोन टॅपिंगचे प्रकरण त्याचाच एक भाग आहे. महागाई, गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्याऐवजी नसते उद्योग चालवले आहेत. काहीही करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी खटाटोप सुरू आहे.