सांगलीतील कारस्थानाचा योग्यवेळी वचपा काढणारच-विश्वजीत कदम
By अविनाश कोळी | Published: April 25, 2024 08:31 PM2024-04-25T20:31:00+5:302024-04-25T20:31:21+5:30
पडद्यामागच्या राजकारणावर काँग्रेस मेळाव्यात संताप
सांगली: लोकसभेसाठी सांगलीत वेगळे राजकारण शिजत असल्याची कल्पना आम्ही वरिष्ठ नेत्यांना दिली होती. तरीही येथील कटकारस्थान यशस्वी करण्यात काही लोक यशस्वी झाले. त्यांच्या या कटाचा वचपा योग्यवेळी काढणारच, असा इशारा काँग्रेसचे नेते आमदार विश्वजीत कदम यांनी गुरुवारी काँग्रेस मेळाव्यात दिला.
कदम म्हणाले, जिल्ह्यातील काँग्रेसला गेल्या पंधरा वर्षांत अनेक धक्के बसले. पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख, मदन पाटील, हाफिज धत्तुरे अशा दिग्गज नेत्यांचे निधन झाल्याने पक्षाची जबाबदारी आमच्यासारख्या तरुणांवर पडली. पूर्वी पक्षात याठिकाणी गटबाजी दिसून येत होती. मात्र, आम्ही गटबाजीला मूठमाती देऊन काँग्रेस एकसंध केली. लोकसभा निवडणुकीसाठीही एकच नाव निश्चित करुन ते पक्षाला पाठविले. हीच गोष्ट काहींना सहन झाली नाही. त्यांनी काँग्रेसच्या एकीला दृष्ट लावली. लवकरच आम्ही त्यांची ही दृष्ट उतरवू.
गेल्या एक वर्षापासून सांगली लोकसभा मतदारसंघात राजकारण शिजत होते. त्याची कल्पनाही आम्ही वरिष्ठांना दिली होती. तरीही कोण काय करीत आहे, यावर बारीक लक्ष का ठेवले गेले नाही, हा सवाल आम्हाला सतावत आहे. आम्ही पोटतिडकीने या जागेसाठी संघर्ष केला. दुसऱ्यांसाठी इतका संघर्ष का करीत आहात, असा सवाल मला काहींनी केला होता, पण माझा लढा पक्षाच्या अस्तित्वासाठी होता. त्यामुळे राज्यातील तसेच देशातील नेत्यांचा वाईटपणा मी घेतला. या काळात मी प्रचंड तणावात होतो. देशहितासाठी आघाडीसोबत राहण्याचे पक्षाचे आदेश आहेत. त्याचे पालन आमच्याकडून केले जाईल.
चौकट
पतंगरावांचे अन् माझेही गुण आहेत
पतंगराव कदम स्पष्ट स्वभावाचे हाेते. वादळात दिवा लावायची त्यांना सवय होती. त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नसल्याचे सांगितले जाते. माझ्यातही त्यांचे गुण आहेत, पण माझे स्वत:चेही काही गुण आहेत. त्यामुळे ज्या लोकांनी आमच्या बाबतीत चुकीचे राजकारण केले त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.